सांगली : कोरोनाच्या काळात ऑक्सिजन प्रकल्पासाठी सांगली-मिरज रस्त्यावरील सिनर्जी हॉस्पिटलला नाममात्र भाड्याने दिलेला भूखंड काढून घेण्याचे आदेश महापौर गीता सुतार यांनी बुधवारी दिले. हा भूखंड अकरा महिन्यांसाठी भाडेतत्त्वावर देण्याची सूचना आयुक्त नितीन कापडणीस यांच्यासह भाजपच्या काही सदस्यांनीही केली होती; पण महापौरांनी ही सूचना फेटाळून लावली.
मिरज रस्त्यावरील सिनर्जी हॉस्पिटलने महापालिकेच्या मोकळ्या भूखंडावर ऑक्सिजन प्रकल्प उभा केला होता. आयुक्त कापडणीस यांनी त्यांच्या अधिकारात हा भूखंड वापरण्यासाठी नाहरकत पत्र दिले होते. अजूनही कोरोना संपलेला नसल्याने या रुग्णालयाला अकरा महिन्यांसाठी दोन लाख २३ हजार रुपये भाडे आकारून भूखंड देण्याचा प्रस्ताव महासभेसमोर ठेवण्यात आला होता.
काँग्रेसच्या नगरसेविका वहिदा नायकवडी यांनी सिनर्जी हॉस्पिटलने कोरोना काळात लाखो रुपयांची बिले आकारली आहेत. गोरगरिबांना सवलतीच्या दरात उपचार केलेले नाही. अशा हॉस्पिटलचे कशासाठी लाड करत आहे, असा सवाल केला. आयुक्त कापडणीस यांनी कोरोना संकटाच्या काळात मिळालेल्या विशेष अधिकारातून हा भूखंड सिनर्जीला दिला आहे. त्यावेळी नागरिकांचे जीव वाचविणे महत्त्वाचे होते. भाडेही आकारले जात आहे. तरीही महासभेच्या समोर हा विषय आणला आहे, असा खुलासा केला. भाजपचे शेखर इनामदार, संगीता खोत, पांडुरंग कोरे यांनी आयुक्तांच्या निर्णयाचे समर्थन केले. ॲ़ड. स्वाती शिंदे यांनी भाडे अत्यंत कमी असून, १० लाख रुपये भाडे घेण्याची मागणी केली.
भाजपच्याच भारती दिगडे यांनी ११ महिन्यांनंतर सिनर्जी हा भूखंड सोडेल असे वाटत नाही. कोरोना काळात हा विषय प्रशासनाने महासभेसमोर का आणला नाही, असा सवाल उपस्थित केला. अखेर महापौरांनी सिनर्जीकडून तीन महिन्यांचे भाडे वसूल करून ऑक्सिजन प्रकल्प काढून घ्यावा, असे आदेश दिले.