सांगली : केंद्र शासनाने जैन समाजाचा अल्पसंख्याकांमध्ये समावेश केला असून, या विभागाच्या विविध योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी संघटित प्रयत्नांची गरज असल्याचे प्रतिपादन आॅल इंडिया जैन मायनॉरिटी सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी यांनी केले. सांगलीत रविवारी संघटनेच्यावतीने मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात गांधी बोलत होते. यावेळी माजी महापौर सुरेश पाटील, डॉ. विजयकुमार शहा, अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य रावसाहेब पाटील, सांगली शाखेचे अध्यक्ष अमित शहा, स्वप्नील शहा उपस्थित होते. गांधी म्हणाले की, केंद्र शासनाच्या अल्पसंख्याकांसाठी अनेक कल्याणकारी योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजे. त्यासाठी जैन मायनॉरिटी सेलची स्थापना केली आहे. अल्पसंख्याक योजनांच्या माहितीसाठी मुस्लिम समाजात स्वतंत्र यंत्रणा आहे. तशी यंत्रणा जैन समाजातही उभी करावी लागेल. व्यापार, उद्योग उभारणीसाठीही शासनाकडे कर्जपुरवठा केला जातो. पण राज्य व केंद्र शासनात समन्वय नसल्याने हा अध्यादेश प्रलंबित आहे. राज्याने कर्जपुरवठ्याची हमी न घेतल्यास पुन्हा संघर्ष उभा करावा लागेल. यावेळी डॉ. अण्णासाहेब पाटील, रोहित शहा, वीरेंद्र येडा, देशभूषण पाटील उपस्थित होते. (प्रतिनिधी)
अल्पसंख्याक योजनेसाठी संघटित प्रयत्न
By admin | Published: July 05, 2015 10:55 PM