सांगली : कोषागार दिनानिमित्त जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यामध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याने सामाजिक बांधिलकी म्हणून रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले. या शिबीरामध्ये कोषागार कार्यालयातील एकूण 20 अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रक्तदान केले.
यावेळी जिल्हा कोषागार अधिकारी सुशिलकुमार केंबळे, अप्पर कोषागार अधिकारी चंद्रकांत पाटील, नंदन कारेकर, सुरेखा जाधव, उपकोषागार अधिकारी संजय दळवी व कर्मचारी उपस्थित होते.महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर शासनाचा जमा व खर्चाचे एकत्रित लेखांकन व संकलन करण्यासाठी शासनाने 1 फेब्रुवारी 1965 रोजी संचालनालय, लेखा व कोषागारेची स्थापना केली आहे. त्यामुळे 1 फेब्रुवारी हा दिवस लेखा व कोषागारे दिन म्हणून साजरा करण्यात येतो. कोषागार हा वित्त विभागाचा कणा आहे. शासकीय निधीचा जमा व खर्च वित्तीय नियमाप्रमाणे करण्याची जबाबदारी कोषागार कार्यालयावर आहे. कोषागार कार्यालयाचे सर्व कामकाज संगणीकृत करण्यात आले आहे.सांगली कोषागार अधिनस्त 10 उपकोषागार कार्यालयात 108 कर्मचारी कार्यरत आहेत. जिल्हा कोषागार कार्यालयामार्फत 26 हजार सेवानिवृत्त शासकीय कर्मचारी व कुटुंबियांना दरमहा 60 कोटी इतके निवृत्ती वेतन निवृत्तीवेतन धारकाच्या खात्यामध्ये 1 तारखेला जमा करण्यात येते. तसेच शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन, भत्ते व इतर कार्यालयीन खर्चाची दरमहा 200 कोटी रक्कमेची देयके पारित करण्यात येतात.रक्तदान शिबीरामध्ये कोषागार कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांची नियमित रक्त तपासणी करण्यात आली. रक्तदान शिबीरास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांनीआवश्यक कर्मचारी व यंत्रसामुग्री देऊन सहकार्य केल्याचे जिल्हा कोषागार अधिकारी सुशिलकुमार केंबळे यांनी सांगितले.