कवठेमहांकाळ : सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठवल्यानंतर राज्यात पुण्यानंतर सांगलीतबैलगाडी शर्यतींचा धुरळा उडणार आहे. पुण्यातील आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडी येथे १ जानेवारीला शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. यानंतर आता सांगलीतील नांगोळे येथे शर्यती होणार असल्याने बैलगाडी शौकीनांना हा थरार पाहता येणार आहे.सांगलीतील एका राजकीय पदाधिकाऱ्याच्या वाढदिवसानिमित्त या बैलगाडी शर्यतीचे मैदान आयोजन करण्यात आले आहे. याला प्रशासनाने रितसर परवानगी दिली आहे. ४ जानेवारी रोजी या शर्यती होणार आहेत. शिवसेना सांगली जिल्हा, आणि राजमाता ब्रिगेड नांगोळे यांच्यावतीने या शर्यतीचे आयोजित करण्यात आल्या आहे. सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडी शर्यतीवर बंदी घातल्यानंतर बऱ्याच वर्षापासून बैलगाडी प्रेमींनी यासाठी मोठा संघर्ष केला. अखेर या लढ्याला यश आले आणि न्यायालयाने शर्यतीला परवानगी दिली. त्यानंतर २० डिसेंबर रोजी राज्य सरकारने अधिकृत शासन निर्णय काढून राज्यातील बैलगाडी शर्यतीवरील बंदी उठवली. या शासन निर्णयानंतर नांगोळे येथे बैलगाडी शर्यतीसाठी पहिलाच अर्ज दाखल करण्यात आला होता.
जिल्हाधिकारी सांगली यांनी दिलेल्या परवानगी नुसार बैलगाडी शर्यतीसाठी ची धावपट्टी १००० मीटर पेक्षा कमी अंतराचे असणार नाही, गाडीवान आणि बैलांची छायाचित्रे ४८ तास आधी प्रशासनाकडे जमा करावे लागतील, सहभागी होणाऱ्या बैलांची वैद्यकीय तपासणी करावी लागेल, शर्यतीच्या ठिकाणी शासनाकडून प्रति नियुक्त दोन अधिकारी उपस्थित असतील, गाडीवान किंवा शर्यतीच्या ठिकाणी कोणीही चाबूक काठी शॉक देण्याचे साहित्य जवळ लागणार नाही, पाय बांधणे, काठीने मारणे, चाबकाने मारणे, शॉक देणे, शेपटाचा चावा घेणे, लाथ मारणे अशा कोणत्याही गोष्टी गाडीवानाला करता येणार नाहीत.
आयोजकांना शर्यतीच्या ठिकाणी पशुवैद्यकीय सेवा तसेच पशु रुग्णवाहिकेची सेवा उपलब्ध ठेवावी लागेल. अशा जवळपास 26 नियमांसह प्रशासनाने बैलगाडी शर्यती साठी परवानगी दिली आहे.
पश्चिम महाराष्ट्रात बैलगाडी शर्यतीची मोठी क्रेझ आहे. मोठ्या मोठ्या यात्रेमध्ये लाखोंचे बक्षिसे ग्रामीण भागात लावण्यात येतात. इतकेच नाही तर या शर्यतीतील बैलाच्या किंमती देखील लाखांच्या घरात आहेत. बैलगाडी मालक आपल्या बैलावरही तितकेच प्रेम करतात. शर्यत जिंकताच ग्रामीण भागात बैलाची मोठी मिरवणूक देखील काढली जाते.