सांगली : प्रथमाचार्य १०८ शांतिसागरजी महाराज यांच्या ६१ व्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार, दि. १ सप्टेंबर ते ३ सप्टेंबरअखेर कोल्हापूर जिल्ह्यातील अब्दुललाट येथे कार्यक्रम होणार आहेत. या कालावधित कृषी प्रदर्शन, पीक स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धेसह शांती सद्भावना रॅलीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती दक्षिण भारत जैन सभेचे मुख्यमहामंत्री डॉ. अजित पाटील यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. पाटील यांनी सांगितले की, विसाव्या शतकातील प्रथमाचार्य १०८ शांतिसागरजी महाराज हे एक प्रभावी मुनी होते. त्यांची ६१ वी पुण्यतिथी दरवर्षी विविध उपक्रमांनी साजरी करण्यात येते. यावर्षी शिरोळ तालुक्यातील अ. लाट येथे विविध कार्यक्रम होणार आहेत. या पुण्यतिथी कार्यक्रमात १ सप्टेंबरला महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा, २ सप्टेंबरला पाठशाळांतर्गत वक्तृत्व व गीतनृत्य स्पर्धा होणार आहेत. २ व ३ सप्टेंबरला कृषी प्रदर्शन व पीक स्पर्धा होणार असून, वीराचार्य, शांतिसागर व कर्मवीरांच्या जीवन दर्शनाचे प्रदर्शन होणार आहे. ३ सप्टेंबरला शांतीकलशाचे स्वागत व अहिंसा, शाकाहार, व्यसनमुक्ती, राष्ट्रीय एकात्मता शांतीसद्भावना रॅलीचे आयोजन करण्यात आले असून, याची सुरुवात जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांच्याहस्ते होणार आहे. दुपारी मुख्य कार्यक्रमात कोल्हापूर परिक्षेत्राचे महासंचालक विश्वास नांगरे पाटील हे मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमास दक्षिण भारत जैन सभा व वीर सेवा दलाचे पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी एन. जे. पाटील, आदगौंडा पाटील, अरुण पाटील आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
शांतिसागर महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त अब्दुललाट येथे कृषी प्रदर्शनाचे आयोजन
By admin | Published: August 28, 2016 12:16 AM