सांगली - दुधोंडी (ता. पलूस ) येथे रविवारी (दि. ६) युवा कबड्डी लीग स्पर्धा आयोजित केल्या आहेत. पण त्यासाठी राज्य कबड्डी असोसिएशनची परवानगी नाही, त्यामुळे कबड्डीपटूंनी सहभागी होऊ नये असे आवाहन महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष दिनकर पाटील व जिल्हा सचिव नितीन शिंदे यांनी केले आहे.
दरम्यान, स्पर्धेत सहभागासाठी प्रत्येकी ५०० रुपयांचे शुल्क आकारले जात आहे, त्यातून मोठ्या प्रमाणात पैसे गोळा करण्याचा हेतू असल्याचा दावा पाटील यांनी केला. संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष रामभाऊ घोडके यावेळी उपस्थित होते.पाटील म्हणाले की, धुळ्याच्या एका अनधिकृत संस्थेकडून राज्यभरात कबड्डी लीग आयोजित केल्या जात आहेत. यापूर्वी धुळे, अकोला, यवतमाळ, भंडारा, नागपूर, वर्धा, वरोरा, हिंगोली, नांदेड, उस्मानाबाद, करमाळा तसेच ठाण्यात आयोजनाचा प्रयत्न झाला. राज्य कबड्डी असोसिएशनची त्याला परवानगी नव्हती, त्यामुळे ठाण्यासह अनेक ठिकाणी स्पर्धा उधळवून लावण्यात आली. पोलीसांतही तक्रारी देण्यात आल्या.दरम्यान, सांगलीतही कबड्डी असोसिएशनने पोलीसांत धाव घेतली आहे. सचिव शिंदे यांनी तक्रारीत म्हटले आहे की, दुधोंडी येथील लीगसाठी राज्य कबड्डी असोसिएशनची मान्यता नाही. कोरोना काळात आपत्ती व्यवस्थापनाचे नियम धुडकावून आयोजन केले जात आहे. त्यामुळे स्पर्धांना प्रतिबंध करावा. दुधोंडीमधील छत्रपती शिवाजी महाराज आखाड्यालाही माहिती दिली आहे. लीगमध्ये सहभागी होणार्या खेळाडू, प्रशिक्षक तसेच संयोजकांवरही कारवाईचा इशारा दिला आहे.दिनकर पाटील म्हणाले की, राज्यात अनेक ठिकाणी या लीगच्या आयोजनाचा प्रयत्न झाला. प्रत्येक खेळाडूंकडून पाचशे रुपयांप्रमाणे गल्ला जमविण्याचाही प्रयत्न झाला. राज्य संघटनेची परवानगी नसल्याने ठिकठिकाणी लीग उधळवून लावण्यात आल्या. दुधोंडीतही होऊ देणार नाही.