सांगली : एमपीएससीची रविवारी (दि. १४) होणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा पुन्हा रद्द केल्याने परीक्षार्थींच्या संतापाचा भडका उडाला आहे. परीक्षा तोंडावर आलेली असताना ती रद्द करून शासनाने विद्यार्थ्यांचे न भरून येणारे नुकसान केल्याच्या संतप्त भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.
गेल्या वर्षभरात विविध कारणांनी जवळपास चौथ्यांदा ही परीक्षा रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे परीक्षेची तयारी करणाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. परीक्षेची प्रतीक्षा करण्यातच वय निघून चालले आहे, त्यातच सरकार असा खेळखंडोबा करत असेल तर तरुणांनी या परीक्षा द्यायच्या की नाही, असाही सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. सांगलीत अडीच हजारांवर परीक्षार्थींनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. त्यांना हॉल तिकिटेही देण्यात आली आहेत, शिवाय जिल्हा प्रशासनानेही तयारी केली आहे. परीक्षेसाठी सांगली-मिरजेत २७ केंद्रे निश्चित केली आहेत. सुपरवायझर, समन्वयक, केंद्रप्रमुख आदी नियुक्त्याही दिल्या आहेत. या स्थितीत गुरुवारी दुपारी परीक्षा रद्दचा निर्णय जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये अक्षरश: आगडोंब उसळला.
चौकट
विद्यार्थी आणि प्रशासन सज्ज
परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी आणि परीक्षार्थींनीही तयारी पूर्ण केली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारी यासंदर्भात स्वतंत्र आदेश काढला होता. त्याद्वारे सांगली-मिरजेतील २७ परीक्षा केंद्रांची माहिती प्रसिद्ध केली होती. या केंद्र परिसरात सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत जमावबंदी लागू केल्याचे जाहीर केले होते. शासकीय कर्मचारी वगळता इतरांना परिसरात वावरण्यास मज्जाव केला होता. केंद्रावर नियुक्तीसाठी कर्मचारीही निश्चित केले होते. विद्यार्थ्यांना हॉल तिकीटही मिळाले होते. दीड वर्षाने परीक्षा होणार असल्याने विद्यार्थीही अखेरची तयारी करत होते. ती रद्द झाल्याने सर्व तयारीवर पाणी फिरले आहे.
चौकट
चौथ्यांदा रद्द झाली परीक्षा
गेल्या वर्षभरात चौथ्यांदा परीक्षा रद्द झाली आहे. फेब्रुवारी २०१९ मध्ये शेवटची परीक्षा झाली होती. त्यानंतर २०२० ची परीक्षा जाहीर झाली, ती आजवर होऊ शकलेली नाही. एप्रिल २०२० ची परीक्षा कोरोनामुळे रद्द झाली. सप्टेंबर २०२० मध्येही झाली नाही. ऑक्टोबर २०२० मध्ये दोनदा परीक्षा जाहीर झाल्या व पुन्हा रद्दही झाल्या. आता मार्चमध्ये नक्की होणार याची आशा असताना पुन्हा रद्द झाली.
चौकट
पॉईंटर्स
नोंद केलेले परीक्षार्थी - २५००
केंद्रे - २७
कोट
यूपीएससीची परीक्षा होऊ शकते, इतर परीक्षाही होतात, मग एमपीएससीची परीक्षा का होत नाही, असा प्रश्न आहे. सरकारने तरुणांच्या भावनांशी खेळखंडोबा सुरू केला आहे. कोरोनामुळे परीक्षा रद्द हे गुरुवारी सांगितलेले कारण समर्थनीय नाही.
- स्वप्निल ऐतवडेकर
एकाच परीक्षेसाठी पाच वेळा अभ्यास करायचा ही जगातील एकमेव परीक्षा आहे. पूर्व परीक्षेसाठी वर्षभरापासून अभ्यास करतोय, आज ना उद्या होईल म्हणून तग धरलाय. आज पुन्हा परीक्षा रद्द झाल्याचे कळताच निराश झालो.
- शैलेश नरुटे
गेल्या दहा वर्षांपासून एमपीएससीच्या जागांची संख्या कमी होतेय. परीक्षार्थींची संख्या मात्र वाढती आहे. स्पर्धा वाढल्याने विद्यार्थी जीव तोडून अभ्यास करतात. त्याची कदर सरकारला नसल्याचे दिसते. सरकारला राजकारण करण्यातच रस आहे.
- शरद सरगर
परीक्षा घेणार की नाही हे सरकारने एकदाच स्पष्टपणे सांगून टाकावे, आम्हालाही अभ्यास करायचा की नाही हे ठरविता येईल. अन्य अभ्यासक्रमांकडे वळता येईल. कोणाच्या तरी दबावाखाली येऊन सरकार धरसोड करत असेल तर ते निषेधार्ह आहे.
- आप्पासाहेब सावंत
कोरोनामुळे परीक्षा स्थगित करण्याचे कारण न पटणारे आहे. विधिमंडळाचे अधिवेशन होऊ शकते, राज्यभरात मेळावे होताहेत, इतर परीक्षादेखील होतात, मग राज्य सेवा पूर्व परीक्षेलाच कोरोनाचा धोका कसा, हे समजत नाही.
- अनंत विभुते
गेल्या वर्षभरात पाच वेळा अभ्यास केला आणि त्या-त्या वेळी परीक्षा रद्द झाल्या. यातून सरकार तरुणांचा विश्वास गमावत आहे. वय निघून जाण्याने अनेक तरुणांचे न भरून येणारे नुकसान होत आहे. रात्रंदिवस अभ्यास करणाऱ्या तरुणांच्या भावनांची सरकारला जाण नाही असे दिसते.
- मयूर साने