जत : जत पूर्वभागाला वरदान ठरणाऱ्या विस्तारित म्हैसाळ योजनेच्या पहिल्या टप्प्याचे काम सुरू झाले आहे. मात्र, वंचित गावांना लाभ देण्याचा पत्ता नाही. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी सर्वेक्षण करून प्रशासकीय मान्यतेसह उर्वरित कामांची निविदा काढावी, अन्यथा उपोषण, रास्ता रोको, मोर्चे काढू. याची दखल न घेतल्यास लोकसभा निवडणुकीवर ६५ गावे बहिष्कार टाकतील, असा इशारा माजी आमदार विलासराव जगताप यांनी मंगळवारी दिला.विस्तारित म्हैसाळ योजनेसंदर्भात जगताप यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक पार पडली. बैठकीत माजी सभापती सुरेश शिंदे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब कोडग, माजी सभापती आकाराम मासाळ, माजी पंचायत समिती सदस्य रवींद्र सावंत, दिग्विजय चव्हाण, अभिजित चव्हाण उपस्थित होते.जगताप म्हणाले, १९८८ पासून आम्ही पाण्यासाठी संघर्ष करीत आहोत. ४० वर्षे झाली तरी अद्याप मूळ योजनाच पूर्ण नाही. योजनेपासून वंचित गावांनी संघर्ष केल्यानंतर विस्तारित योजना करण्यात आली. यासाठी १ हजार ९०० कोटी मंजूर करण्यात आले. यातील पहिल्या टप्प्यासाठी ९०० कोटी देण्यात आले. याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र, वंचित ६५ गावांसाठीच्या कामांचा अद्याप पत्ताच नाही. या गावांना न्याय देण्यासाठी पुन्हा संघर्ष करण्याची वेळ आली आहे. याप्रश्नी जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात उपोषण, फेब्रुवारीत रास्ता रोको, मार्चमध्ये भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. याची दखल न घेतल्यास वंचित ६५ गावे लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकतील.विस्तारित योजनेत येळदरीपासून चार मुख्य जलवाहिन्या जाणार आहेत. पहिली मुचंडी-अक्कळवाडी, दुसरी उमदी, तिसरी उमराणी आणि चौथी वाषाण अशी एकूण १३४ किलोमीटरची जलवाहिनी जाणार आहे. त्यानंतर उपवाहिन्यांचे कामही होणार आहे. या योजनेतून संख, दोड्डनाला मध्यम प्रकल्पासह २५ तलाव, ३२३ पाझर तलाव व ३० कोल्हापूर पद्धतीचे बंधारे भरून घेण्यात येतील. या योजनेतून १ लाख एकर जमीन ओलिताखाली येणार आहे.प्रारंभी म्हैसाळचे उपअभियंता पाटील यांनी विस्तारित योजनेची माहिती दिली. ते म्हणाले, विस्तारित योजनेचे सर्वेक्षण सुरू आहे. प्रत्येक गावातील लाभक्षेत्राचा नकाशा गावात लावण्यात येईल. यातूनही काही भाग वंचित राहिल्यास त्याचाही या योजनेत समावेश करून घेण्यात येईल.यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष प्रमोद सावंत, संग्राम जगताप, विष्णू चव्हाण, रमेश जगताप, मिलिंद पाटील, मंगेश सावंत, राजेंद्र डफळे, सोमन्ना हक्के आदी उपस्थित होते.
..अन्यथा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार, माजी आमदार विलासराव जगताप यांनी दिला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2024 6:09 PM