सांगली : संजयनगरमधील राजकारणामध्ये लक्ष घालू नका, अन्यथा तुम्हाला खुनाच्या गुन्ह्यात अडकवेन. राजकारणाचा शेवट कळंबा, येरवडा जेल, तसेच स्मशानभूमीकडे जातो, अशी धमकी भाजपचे संघटन सरचिटणीस दीपक माने यांनी दिल्याची माहिती काँग्रेसच्या नगरसेविका वर्षा निंबाळकर यांचे पती अमर निंबाळकर यांनी मंगळवारी पत्रकार बैठकीत दिली. याबाबत विश्रामबाग पोलिस ठाण्यात मानेविरोधात तक्रार दिल्याचेही निंबाळकर यांनी सांगितले. निंबाळकर म्हणाले, ३० एप्रिल रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास भाजपचे संघटन सरचिटणीस माने यांचा दूरध्वनी आला. संजयनगरचे राजकारण वेगळ्या वळणावर आहे. काँग्रेसचे नगरसेवक मनोज सरगर यांच्याबरोबर फिरू नको. त्यांच्यासह १५ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसे तुमचेही नाव गुन्ह्यात घातले असते. येथील राजकारणाचा शेवट एक तर कळंबा, येरवडा जेलमध्ये किंवा थेट स्मशानात जातो. यापुढे संजयनगरमध्ये खून झाल्यास त्यात तुमचेही नाव घातले जाईल, अशी धमकी दिली.राजकीय सुडातून माने यांनी धमकी दिली आहे. आपल्याला खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचा त्यांचा डाव आहे. याबाबत विश्रामबाग पोलिस ठाण्यात माने यांच्या विरोधात तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी कलम ५०६ व ५०७ नुसार अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. धमकीची ऑडिओ क्लिप पोलिसांना दिली आहे. त्यांनी माने यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणीही निंबाळकर यांनी केली आहे.
Sangli News:..अन्यथा खुनाच्या गुन्ह्यात अडकवेन, भाजप पदाधिकाऱ्यांकडून काँग्रेस नगरसेविका पतीला धमकी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2023 12:38 PM