लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : चित्रपट व मालिकांचे चित्रीकरण सांगलीत करताना स्थानिक कलाकारांना प्रधान्य द्यावे, अन्यथा हे चित्रीकरण बंद पाडण्यात येईल, असा इशारा भाजप महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा नगरसेविका स्वाती शिंदे यांनी दिला.
भाजप चित्रपट कामगार आघाडीच्यावतीने कलाकारांना जीवनावश्यक वस्तूंच्या कीटच्या वाटपाचा कार्यक्रम पार पडला. चित्रपट कामगार आघाडी महिला जिल्हाध्यक्षा सौ. सुस्मिता कुलकर्णी, नगरसेविका उर्मिला बेलवलकर, गीतांजली ढोपे-पाटील यांनी संयोजन केले होते.
यावेळी स्वाती शिंदे म्हणाल्या की, कोरोना काळात कलाकार, कर्मचारी, वेशभूषाकार, केशभूषाकार, मेकअप कलाकार यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. अशावेळेस भाजप चित्रपट कामगार आघाडीने त्यांना मदतीचा हात दिला आहे. शासनाकडून मिळणाऱ्या कलाकार मानधनाकरिता प्रस्ताव तयार करण्याकरिता भाजप मदत करेल. सांगली जिल्ह्यात मालिका व चित्रपटांचे शुटिंग करत असताना प्रथम प्राधान्य सांगलीतील कलाकारांना व कर्मचाऱ्यांना मिळाले पाहिजे. प्राधान्य न दिल्यास शुटिंग बंद पाडण्यात येईल. यावेळी प्रथमेश सूर्यवंशी, स्नेहा रोकडे, सुनीता इनामदार, सोनल शहा, प्रथमेश वैद्य, अनिकोत खिलारे, गजानन मोरे, आशिष साळुंखे आदी उपस्थित होते.