सांगली : राष्ट्रवादी काँग्रेसमधील वादाचा न्यायनिवाडा निवडणुक आयोगाकडून होईल, तोपर्यंत हा वाद टळावा, यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. घरातील वाद घरात संपावा, असा आमचा प्रयत्न आहे. पण त्याला यश आलेले नाही, असे सांगत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगलीत शरद पवार- अजित पवार भेटीवर भाष्य केले.
महापालिकेच्या प्रतापसिंह उद्यानातील पक्षी संग्रहालयाच्या भूमीपूजनासाठी जयंत पाटील सांगलीत आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शरद पवार, अजित पवार भेटीबाबत विचारता ते म्हणाले की, राजकारणात बेरीज करायची असते. भागाकार, वजाबाकी होऊ नये, याची दक्षता पक्षाच्या अध्यक्षांनी घ्यायची असते. पक्षातील फुट टाळण्याची आम्ही प्रयत्न करीत आहोत. पक्षातील अनेकजण प्रयत्नशील आहेत. पण त्याला यश आलेले नाही. राज्यात महाआघाडी खंबीर आहे. शरद पवार यांची भूमिकाही स्पष्ट आहे. त्यामुळे कुणीही शंका बाळगण्याचे कारण नाही.
भाजप प्रवेशाच्या वृत्ताबाबत ते म्हणाले की, माझे सर्व पक्षातील नेत्यांशी संबंध आहे. मध्यंतरी भाजप प्रवेशाच्या वावड्या उठल्या. पण असा पक्ष बदलता येतो का? मी एका पक्षाचा अध्यक्ष आहे. लोक बोलत असतात. विश्लेषण करीत असतात. लोकशाहीत सर्वांनीच तुम्हाला चांगले बोलले पाहिजे, अशी अपेक्षा चुकीची असल्याचेही पाटील म्हणाले.
जाती-धर्मात संघर्षाचा प्रयत्नसंभाजी भिडे यांच्याबाबत पाटील म्हणाले की, महात्मा गांधी यांच्याबद्दल ७५ वर्षानंतर वक्तव्य करून त्यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न चुकीचा आहे. निवडणुका जवळ आल्याने राज्यातील सत्ताधाऱ्यांनी अनेकांना कामे वाटून दिली आहेत. जाती-धर्मात संघर्ष व्हावा, यासाठी अप्रत्यक्ष प्रयत्न सुरू असल्याची टीका केली.
मुख्यमंत्र्यांनी आपला दवाखान्याकडे लक्ष द्यावेठाणे रुग्णालयातील रुग्णांच्या मृत्यूचा प्रकार गंभीर आहे. मुख्यमंत्र्यांनी आपला दवाखान्याकडे आधी बघावे. त्यात सुधारणा कराव्यात. ते नक्कीच ही बाब गांभीर्याने घेतील, असा टोलाही लगाविला .