विशाल पाटील...सांगलीतील सध्याचे चर्चेतले नाव. त्यांनी थेट पवार-ठाकरे यांचे नाव घेत उदाहरण दिले. शरद पवार दावा करतात, त्यांचा पक्ष हा राष्ट्रवादीच आहे. त्यांचे चिन्ह त्यांच्यापासून चोरले गेले. उद्धव ठाकरेही दावा करतात, त्यांचा पक्ष शिवसेनाच आहे; पण त्यांचे चिन्ह जे धनुष्यबाण होते, ते त्यांच्याकडून चोरले गेले. तेच आमच्याबाबतीत सांगलीत झाले आहे. आमचा पक्ष काँग्रेसच आहे, सांगलीत आमचे चिन्ह आमच्यापासून चोरले गेले असल्याचा आरोप विशाल पाटील यांनी ‘लोकमत डिजिटल’चे संपादक आशिष जाधव यांना दिलेल्या मुलाखतीत केला.
सांगलीच्या जागेवरून महाविकास आघाडीत बऱ्याच घडामोडी घडल्या. शिवसेनेला जागा गेल्यानंतर सांगलीतील बहुतांश नेते, पदाधिकारी हे विशाल पाटील यांच्याच बाजूने होते. त्याबाबतच विशाल पाटील यांना प्रश्न विचारला असता, काँग्रेस हा एकमेव पक्ष आहे, ज्याला महाविकास आघाडीचे महत्त्व समजते. इंडिया आघाडीत खऱ्या अर्थाने भाजप सरकारला घालवण्यास एकत्र यायचे, हा काँग्रेसचा अजेंडा आहे. इतरांचे मात्र काही वेगळे अजेंडे आहेत. कुणाला पक्षसंघटना वाढवायची आहे; तर कुणाला नवीन नेतृत्व तयार करायचे आहे.
नाना पटोलेंनी आक्रमक भूमिका घेतली नाहीकाँग्रेस ही आघाडी करत असताना त्याग करण्याच्या भूमिकेत आहे. त्यातून सांगलीसारख्या जागेचा बळी द्यावा लागला. काँग्रेसचा माणूस म्हणून सांगली नाही मिळाली तर आघाडी तोडू, ही भूमिका काँग्रेसने घ्यायला हवा होती. तो अधिकार राज्याच्या नेतृत्वाला नव्हता. केंद्रातील नेतृत्व चर्चेला नसायचे; यामुळे सांगलीची जागा गेली. नाना पटोलेंनी आक्रमक भूमिका घेतली नाही. उद्धव ठाकरेंनी परस्पर उमेदवारी जाहीर केल्यानंतर नाना पटोलेंनी भूमिका मांडली; पण ती ते शेवटपर्यंत टिकवू शकले नाहीत. सांगलीच्या जागेवरून दिल्लीपर्यंत गेलो. विश्वजित कदमांनी पुढाकार घेतला होता; पण शिवसेना ऐकायला तयार नव्हती, असेही विशाल पाटील म्हणाले.
स्व. वसंतदादा पाटील यांनी शिवसेनेसाठी खूप केलं असं लोक म्हणतात. उद्धव ठाकरेंना माहीत असेल-नसेल, मला माहीत नाही. उद्धव ठाकरेंनी कोल्हापुरात जाऊन वक्तव्य केलं की, शाहू महाराजांसाठी आम्ही ही जागा सोडली; पण त्या बदल्यात दुसरी जागा मागणे, मग तो मोठेपणा राहिला का? सांगलीच्या भावना त्यांच्या लक्षात आल्या नाहीत. आपण चुकतोय हे माहीत असूनसुद्धा ते रेटत गेले. - विशाल पाटील, अपक्ष उमेदवार