सांगली : जिल्ह्यात पावसाची संततधार सुरुच असून धरण क्षेत्रातील पावसाचा जोर कायम आहे. कोयनेतून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू असून कृष्णा नदी अनेकठिकाणी पात्राबाहेर पडली आहे. कोयना व वारणा धरण क्षेत्रात रविवारी सायंकाळी पावसाचा जोर कमी झाला होता. सोमवारी सकाळी पुन्हा जोर वाढल्याने विसर्ग कायम राहिला आहे. कोयनेतून ५६ हजार ४३१ तर वारणा धरणातून १४ हजार ४८६ क्युसेक विसर्ग सुरू आहे. त्यामुळे कृष्णा व वारणा नद्यांच्या पाणीपातळीत गतीने वाढ होऊ लागली आहे.
सांगलीत कृष्णेची पातळी दुपारी १२ वाजेपर्यंत ३३.६ फूट इतकी झाली होती. सांगली, पलूस तालुक्यात कृष्णा नदी पात्राबाहेर पडली आहे. सांगली शहरातील कर्नाळ रस्त्यावर पाणी येत असून नदीकाठी असलेल्या वस्त्यांमधील लोकांचे स्थलांतर सुरू झाले आहे. पलूस तालुक्यात अंकलखोप-अमणापूर पुल पाण्याखाली गेला आहे.
वारणा नदी यापूर्वीच पात्राबाहेर पडली असून शिराळा तालुक्यातील एकूण ७ पुल पाण्याखाली गेले आहेत. जिल्ह्यात सोमवारी सकाळी नोंदलेल्या आकडेवारीनुसार एकूण सरासरी १६.६७ मि.मी. पाऊस झाला असून सर्वाधिक पाऊस शिराळा तालुक्यात ५१.७ मि.मी. इतका झाला आहे. वारणा धरण क्षेत्रात सोमवारी सकाळी आठपर्यंत १२३ मि.मी. पाऊस नोंदला गेला.
जिल्ह्यात शिराळा तालुक्यात ५१.७ मि. मी. पावसाची नोंद
सांगली जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी १६.६७ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. शिराळा तालुक्यात सर्वाधिक ५१.७ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.जिल्ह्यात गेल्या २४ तासात पडलेला पाऊस
मिरज १३.८ (३९२.२), तासगाव ११.३ (३५४.३), कवठेमहांकाळ ८.८ (४०३.९), वाळवा-इस्लामपूर २५.१ (४५४.३), शिराळा ५१.७ (१०३३.१), कडेगाव ११.२ (३६४.७), पलूस १२.८ (३१६.२), खानापूर-विटा ७.८ (४६३.८), आटपाडी ०, (२८६), जत ७.५ (२३१.९).