सांगली : जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असून चांदोली धरण परिसरात गेल्या चोवीस तासात अतिवृष्टी झाली आहे. धरणातून १७ हजार ३२0 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू असून वारणा नदी पात्राबाहेर पडली आहे. त्यामुळे शिराळा तालुक्यातील आरळा-शित्तूर पूल पाण्याखाली गेला आहे.
जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी सुरू आहे. त्याचबरोबर इस्लामूपर, सांगली, मिरजेतही पावसाने हजेरी लावली आहे.
गत आठवड्यात पावसाचा जोर ओसरल्याने वारणा नदीच्या पाणीपातळीत प्रचंड घट झाली होती. अनेकठिकाणी पात्र कोरडे पडले होते. मात्र गेल्या चार दिवसात पुन्हा परिस्थिती बदलली असून मुसळधार पावसामुळे धरणातून विसर्ग सुरू झाला आहे. त्यामुळे नदी पात्राबाहेर पडली आहे. यात बुधवारपर्यंत आणखी वाढ होणार आहे.
शिराळा तालुक्यातील आरळा-शित्तूर पूल पाण्याखाली गेला असून नदीकाठची शेतीही पाण्याखाली गेली आहे. सोनवडे, आरळा, काळुंद्रे, चरण परिसरात भात पिके आडवी झाली आहेत.