इस्लामपूर : इस्लामपुरात आरोग्य सुविधा कोलमडून पडल्यामुळे कोरोनासोबत डेंग्यूसदृश साथीचा फैलाव झाला आहे. ती आटोक्यात आणण्यासाठी पालिका प्रशासन धडपडत आहे, मात्र आरोग्य विभागच ‘सलाइन’वर असल्याचे चित्र आहे.
इस्लामपूर आणि परिसरात लॉकडाऊनचे नियम धाब्यावर बसवले जात आहेत. प्रशासनालाही त्याचे गांभीर्य नाही. परिणामी कोरोना संसर्ग आटोक्यात येत नाही. सध्या रुग्णालयांमध्ये डेंग्यू आणि तापाचे रुग्ण वाढत आहेत. यावर उपाययोजना करण्यात नगरपालिका प्रशासन कमी पडत आहे.
नगरपालिकेचे मुख्य अधिकारी पद सध्या रिकामे आहे. त्यामुळे निर्णय लवकर होत नाही. शहरातील स्वच्छता ठेकेदारावर कोणाचा अंकुश नाही. ठिकठिकाणी गटारी तुंबल्या आहेत. रस्त्यावर खड्डे असल्याने पाण्याची डबकी तयार झाली आहेत. सखल भागात पाणी साचले आहे. यातूनच डेंग्यू पसरला जात आहे.
कोणत्याही तापाच्या रुग्णाला रुग्णालयात नेले की, आधी कोरोना चाचणी करण्याची सक्ती असते. त्यानंतर इतर तपासण्या होतात. त्यामुळे खासगी प्रयोगशाळांतून चाचण्यांसाठी हजारो रुपये उकळले जात आहेत. उपचारासाठीही पन्नास हजारांच्या आसपास खर्च येत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे अर्थकारण कोलमडले आहे. काहींना उपचाराविना जीव गमवावा लागला आहे. तरीही रुग्णालयांमध्ये गर्दी दिसत आहे.
पाण्याच्या निचऱ्याचा अभाव
शहरात सध्या गटारींची कामे सुरू आहेत. त्यातच पावसाळा सुरू असल्यामुळे पाण्याचा निचरा होत नाही. पालिकेकडून कीटकनाशक फवारणीही होत नाही. मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती होत आहे. त्यामुळे डेंग्यू, चिकुन गुन्यासारखे आजार पसरत आहेत. यावर उपाययोजना करण्यासाठी आरोग्य विभाग सक्षम नसल्याचे चित्र आहे.