महेश देसाई शिरढोण : कवठेमहांकाळ तालुक्यात झालेल्या जोरदार पावसाने द्राक्षबागांवर डाऊनी, करपा व घडकुजीचा प्रादुर्भाव वाढला आहे. शिरढोण, कुकटोळी परिसरात यामुळे द्राक्षबागायतदारांना आर्थिक फटका बसला आहे.तालुक्यात डाऊनीचा सर्वाधिक फटका आगाप द्राक्षबागायत क्षेत्राला बसला आहे. फुलोऱ्यात असलेल्या द्राक्षबागांच्या घडामध्ये पावसाचे पाणी साचल्याने व ढगाळ वातावरणामुळे बागेतील घड कुजत आहेत. दुसऱ्या डिपिंगच्या अवस्थेत असलेल्या बागेतील पानावर व घडावर डाऊनीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. पहाटेच्यावेळी दव पडल्याने या रोगाचा प्रसार वेगाने होत आहे. यामुळे शेतकरी धास्तावले आहेत.बाजारात डाऊनीस रोखण्यासाठी मिळणारी औषधे कुचकामी ठरत आहेत. एक हजारापासून ते सहा ते सात हजार रुपयांपर्यंत किलो किंवा लिटरमध्ये मिळणाऱ्या औषधांच्या दिवसातून दोनवेळा फवारणी करावी लागते. तरीही डाऊनी आटोक्यात येत नाही. यामुळे बागायतदार हवालदिल झाले आहे.औषधे, खते आणि मजुरांवर केलेला खर्च डोक्यावर कर्ज म्हणून राहणार आहे. या भीतीने शेतकरी हादरले आहेत.बाजारात मिळणाऱ्या औषधांच्या दर्जावर शासनाचे नियंत्रण नाही. त्यामुळे अत्यंत सुमार दर्जाची औषधे बाजारात आली आहेत. त्यासाठी हजारो रुपये खर्च करूनसुद्धा डाऊनी आटोक्यात येत नाही.
प्रशासनाने ना पंचनामा केला ना कोणतीही आकडेवारी घेतली. लोकप्रतिनिधींनाही नुकसानीची पाहणी करायलाही वेळ नाही. तरी प्रशासनाने या नुकसानीचे किमान पंचनामे तरी करावेत, अशी मागणी होत आहे.