तासगाव : शनिवारी-रविवारी बंदच्या मानसिकतेत असणाऱ्या तासगावच्या व्यापाऱ्यांना मंगळवारी सकाळपासूनच व्यापार बंद ठेवावा लागला. ‘ब्रेक द चेन’च्या नावाखाली दि. ३० एप्रिलपर्यंत पुन्हा लॉकडाऊन पाळावा लागणार आहे. हे समजताच व्यापाऱ्यांचा संताप उफाळून आला. त्यातच अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली अर्ध्या गावातील व्यवहार सुरू होता. त्यामुळे संतप्त व्यापाऱ्यांनी तासगाव नगरपालिकेत धाव घेतली. तासगावचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे आणि मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांनी संयमाने परिस्थिती हाताळली. व्यापाऱ्यांच्या शंकांचे निरसन केले. यावेळी खासदार संजयकाका पाटील यांनी व्यापाऱ्यांना शासनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले.
महाराष्ट्रातील वाढती कोरोना रुग्णांची संख्या पाहता शासनाने नाही नाही म्हणत छुप्या मार्गाने पुन्हा एकदा लॉकडाऊन जाहीर केला आहे. नागरिकांच्या समोर यायला मंगळवारची सकाळ उजाडावी लागली. मंगळवारी सकाळी तासगावचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे व नगरपालिकेचे मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील आपल्या सहकाऱ्यांसह रस्त्यावर उतरले. अत्यावश्यक सेवा सोडून इतर दुकाने बंद करण्याचे त्यांनी आवाहन केले.
यावेळी मुख्याधिकारी पाटील आपल्या हातात शासनाच्या नियमांचा कागद घेऊन व्यापाऱ्यांना समजावून सांगत होते. शनिवार-रविवारी आम्ही बंद ठेवणार होतो. आता आमची दुकाने का बंद करता? असा व्यापाऱ्यांचा प्रश्न होता. ३० तारखेपर्यंत दुकान बंद ठेवायला लागणार; यामुळे व्यापाऱ्यांचा संताप उफाळून आला. संतप्त व्यापाऱ्यांनी तासगाव पालिकेत धाव घेतली.
मागील लॉक डाऊनच्या संकटातून आता कुठे बाहेर पडतोय. मागच्या वेळीही लाईट बिल, दुकान भाडे, बँकांचे व्याज काही शासनाने माफ केले नाही. विटा, इस्लामपूर या ठिकाणी व्यापार सुरू आहे. मग तासगावातीलच दुकाने बंद? का ? किराणा दुकाने, बेकरी, भाजीबाजारात गर्दी आहे. मग बाकीची दुकाने का बंद? आमच्या आर्थिक प्रश्नावर तोडगा काय?अशा एक ना अनेक प्रश्नांची सरबत्ती व्यापाऱ्यांनी केली.
चौकट
पोलीस निरीक्षक झाडे व मुख्याधिकारी पाटील यांनी अतिशय संयमाने संतप्त व्यापाऱ्यांना शांत केले. पाटील यांनी व्यापाऱ्यांना आपण निवेदन द्या; आम्ही ते शासनाकडे पाठवू, अशा शब्दांत व्यापाऱ्यांची समजूत काढली. पोलीस निरीक्षक झाडे म्हणाले, प्रशासन व्यापाऱ्यांच्या विरोधात अजिबात नाही. संपूर्ण महाराष्ट्र शासन निर्णयाने बंद झाला आहे. फक्त तासगावचा प्रश्न नाही कोरोनाचे पेशंट वाढत असल्यामुळे शासनाने घेतलेल्या निर्णयाला व्यापाऱ्यांनी बंद ठेवून सहकार्य करावेेे असे त्यांनी आवाहन केले.