सांगली : अवसायनातील वसंतदादा शेतकरी सहकारी बॅँकेच्या थकबाकी वसुलीसाठी कारवाईची जोरदार मोहीम सुरू झाली आहे. यापूर्वी १०३ कर्जदार व जामीनदार यांना नोटिसा बजावल्यानंतर आता आणखी १५० जणांना सेक्युरिटायझेशनअंतर्गत नोटिसा काढण्यात येणार आहेत.वसंतदादा बँकेची कर्जदारांकडे १५४ कोटी ३ लाख ८ हजार रुपयांची थकबाकी आहे. त्याच्या वसुलीसाठी जिल्हा उपनिबंधक नीलकंठ करे यांनी मोहीम हाती घेतली आहे. ज्या कर्जदारांनी नोंद गहाण खताने मिळकत तारण दिलेली आहे, अशा मिळकती कर्ज फिटेपर्यंत बँकेकडे गहाण राहणार आहेत.
त्यामुळे सरफेसी अॅक्ट (सेक्युरिटायझेशन अॅण्ड रिकन्स्ट्रक्शन आॅफ असेट्स अॅन्ड इन्फोर्समेंट आॅफ इंटरेस्ट अॅक्ट २००२) नुसार कारवाई करून वसुली होण्यास या प्रकरणांत वाव असल्याचे अवसायकांच्या निदर्शनास आले.
त्यामुळे वसुली प्रक्रिया गतीने होण्यासाठी अवसायकांनी यापूर्वी १०३ लोकांना नोटिसा बजावल्या आहेत. त्यांची मुदत पुढील महिन्यात संपणार असून, त्यानंतर त्यांच्यार कारवाई केली जाणार आहे. त्याचबरोबर आता आणखी १५० कर्जदार व जामीनदारांची यादी तयार करण्यात आली आहे.
येत्या पंधरवड्यात त्यांना सेक्युरिटायझेशनअंतर्गत नोटिसा बजावल्या जाणार आहेत. या कायद्याअंतर्गत कर्जदारांना ६० दिवसांची मुदत आहे. त्या कालावधित त्यांनी थकीत कर्ज भरले नाही, तर संबंधितांची मालमत्ता सरफेसी अॅक्ट यू/एस-९३ (४) नुसार ताब्यात घेऊन त्याची लिलावाने विक्री करण्यात येणार आहे.शिवाय ज्या कर्जदारांनी कर्ज घेतेवेळी बँकेची फसवणूक करून कर्जे घेतलेली आहेत, अशा कर्जदारांना फौजदारी कारवाई करण्याबाबत नोटिसा दिल्या जात आहेत. फौजदारी कारवाई करण्यायोग्य आणखी काही प्रकरणे आहेत का, याबाबत तपासणी करण्यात येत आहे.
नोंद गहाण खताने तारण दिलेली शेतजमीन मिळकत व वसुली दाखला मिळालेल्या कर्जदारांच्याबाबतीत महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६१ च्या नियम-१०७ (डी-१) (५) नुसार पुढील कारवाई करण्यात येणार आहे.बँकेचे अवसायक म्हणून ९ जानेवारी २०१५ रोजी जबाबदारी स्वीकारली होती. तेव्हापासून आजअखेर साडेसहा कोटी रुपयांची कर्जवसुली केली आहे. विमा कंपनीला अजूनही ७ कोटी ९३ लाख रुपये देणे बाकी आहे. त्यामुळे वसुलीची मोहीम हाती घेतली आहे.