सांगली : कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे बाधितांना उपचारासाठी वेळेत माहिती मिळावी, यासाठी सुरू करण्यात आलेल्या हेल्पलाइन क्रमांकास चांगला प्रतिसाद मिळत आहे. जिल्हा परिषदेत सुरू असलेल्या या कॉलसेंटरवर आतापर्यंत १९४० कॉल्स आले आहेत.
कोरोनाबाधितांसह नातेवाइकांना उपलब्ध बेडची माहिती देण्यासह लसीकरणाचीही माहिती या सेंटरमधून देण्यात येत आहे. १५ फेब्रुवारीपासून बेड मॅनेजमेंट कॉलसेंटर सुरू असून आतापर्यंत एक हजार ९४० तर गेल्या १० दिवसांत दररोज ३०० कॉल आले आहेत.
होम आयसोलेशनमध्ये असलेल्या रुग्णांना मिळत असलेल्या आरोग्य सुविधांचीही खात्री करून घेण्यासाठी वेगळे कॉलसेंटर सुरू करण्यात आले आहे. रुग्णांना जिल्हा परिषदेमधून दररोज कॉल करून माहिती घेतली जात आहे. या सेंटरमध्ये शिक्षण विभाग, सामान्य प्रशासन विभाग व इतर विभागाचे अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. या सेंटरचा रुग्णांच्या नातेवाइकांना चांगला उपयोग होत आहे.