सांगली : गेल्या आठवड्यात जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी व महापुरामुळे पुराचा फटका बसणाऱ्या नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे. ज्या ठिकाणी पाणी ओसरले आहे त्याठिकाणी काही कुटुंबे घरी परतली असून, सध्या सात हजार ९०५ कुटुंबांतील ३७ हजार ६५५ व्यक्ती, तसेच सात हजार ९८ जनावरेही स्थलांतरित आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली.
जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी सांगितले की, जिल्ह्यात पूरस्थितीमुळे पूर्णत: बाधित १०, अंशत: बाधित ९५, अशी एकूण १०५ गावे आहेत.
महानगरपालिका क्षेत्रात पाच हजार ४६० कुटुंबांमधील २७ हजार १८१ व्यक्ती, मिरज ग्रामीण ९५० कुटुंबांतील तीन हजार ८८३ व्यक्ती, अपर सांगली ग्रामीणमधील २३६ कुटुंबांतील ६६९ व्यक्ती स्थलांतरित आहेत. वाळव्यात ७३५ कुटुंबांतील तीन हजार ४२२ व्यक्ती, तर शिराळा तालुक्यातील १६ कुटुंबांतील ८७ व्यक्ती, पलूस तालुक्यातील ५०८ कुटुंबांतील दोन हजार ४१३ व्यक्ती स्थलांतरित आहेत.
महानगरपालिका क्षेत्रातील ३४०, मिरज ग्रामीण क्षेत्रातील चार हजार ६२७, अपर सांगली ग्रामीण क्षेत्रातील २४६, वाळवा ८९४, शिराळा ५०१, पलूस तालुक्यातील ४९० जनावरे स्थलांतरित आहेत.