जत : दारूचे व्यसन सोडवण्यासाठी गेलेला मोकाशेवाडी (ता. जत) येथील एकजण जिवाला मुकला. देशी औषध पाजताना झालेल्या झटापटीत त्याला मारहाण झाली आणि खाटेवरून पडून त्याचा मृत्यू झाला. दिनेश राजाराम गायकवाड (४०) असे त्याचे नाव असून त्याच्या मृत्यूस कारणीभूत पत्नीसह चौघांविरुद्ध जत पोलीस ठाण्यात त्याच्या भावाने फिर्याद दिली. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे.
दिनेश गायकवाड माजी सैनिक होता. त्याला दारूचे व्यसन होते. ते सोडविण्यासाठी नातेवाईकांनी सांगोला तालुक्यातील कोळे येथील संदीपान पांडुरंग कचरे या महाराजाशी संपर्क साधला होता. दि. २२ डिसेंबरराेजी सकाळी ११ वाजता पत्नी योगीता गायकवाड, दत्तात्रय महादेव पवार व सुधाकर भानुदास गायकवाड या तिघांनी दिनेशला दुचाकीवरून सांगोला तालुक्यातील कोळे येथे कचरेकडे नेले. कचरे दारू सोडवण्यासाठी देशी औषध देतो.
तेथे दिनेश याला औषध पाजण्यात आले. त्यानंतर आणखी औषध पिण्यासाठी कचरेने जबरदस्ती केली. तथापि दिनेशने नकार दिला. कचरेने त्याला औषध पिण्यासाठी मारहाण केली. औषधा पिल्यानंतर उलटी झाली नाही म्हणून पाणी पाजून परत औषध पाजण्यासाठी दिनेश याला पाइपने मारहाण करण्यात आली. यावेळी झटापटीत दिनेश खाटेवरून खाली पडला. डोक्याला मार लागल्याने तो बेशुद्ध पडला.बेशुद्धावस्थेत त्याला जत ग्रामीण रुग्णालयास आणले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. याबाबत जत पोलिसांत दिनेशचा भाऊ गणेशने पत्नीसह चौघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून, पोलिसांनी योगीता गायकवाड, दत्तात्रय महादेव पवार व सुधाकर भानुदास गायकवाड या तिघा जणांना ताब्यात घेतले आहे. पोलीस उपनिरीक्षक समाधान लवटे पुढील तपास करीत आहेत.