बाबासाहेब परीट
बिळाशी : आजोबा शिक्षक, वडील मुख्याध्यापक आणि नातू उपशिक्षणाधिकारी... १९ वर्षांच्या सेवेनंतर वडिलांना दोन्ही डोळ्यांनी अंधत्व आले. ते घराबाहेर पडू शकले नाहीत. भाऊ दोन्ही डोळ्यांनी अंध आणि अभिजित एका डोळ्याने अंध. अशा विचित्र परिस्थितीतही अंधत्वावर मात करीत कष्टाच्या जिवावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उपशिक्षणाधिकारी होऊन मांगरुळ (ता. शिराळा) येथील अभिजित कुंभार याने आदर्श निर्माण केला.
अभिजित हा मांगरुळ येथील सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी. त्याचे प्राथमिक शिक्षण मांगरुळमधल्या मराठी शाळेत, तर माध्यमिक शिक्षण वारणा प्रसाद विद्यालय (बिळाशी) व शिवाजीराव देशमुख विद्यालय (मांगरुळ) येथे झाले. महाविद्यालयीन शिक्षण बाबा नाईक महाविद्यालय (कोकरुड) येथे पूर्ण करून २०१८ ला त्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पहिली पूर्वपरीक्षा दिली. त्यात अपयश आले. परंतु जिद्द हरला नाही.
मांगरुळचे सिंधुदुर्ग येथे कार्यरत असणारे पोलीस उपअधीक्षक दीपक कांबळे यांची प्रेरणा व त्यांनी स्थापन केलेले मांगरुळ येथील नालंदा अभ्यास केंद्र त्याच्यासाठी दीपस्तंभ ठरले. कोणताही क्लास नाही. डामडौल नाही. सचोटीने अभ्यास हे एकच तंत्र ठेवून २०१९ ला परीक्षा दिली. मुलाखतीत अपयश आले, पण नाराज न होता पुन्हा जोमाने अभ्यास सुरू केला आणि २०२० च्या परीक्षेमध्ये उपशिक्षणाधिकारी पद पटकावले.
घरची परिस्थिती अगदी जेमतेम. वडिलांना पूर्ण अंधत्व आले आणि नोकरी सोडावी लागली. फाटक्या परिस्थितीतही त्यांच्या आईने मुलांना, ध्येयापासून विचलित न होता पुढे जाण्याची प्रेरणा दिली. कुंभारवाड्यातील सर्वच लोकांनी पडत्या काळात त्यांना मदत केली. ग्रंथालय आणि अभ्यासासाठीचा माहोल उभा करण्यात ग्रामस्थ आणि त्याच्या शेजारील सर्वांनीच मदत केली. त्यामुळे परिस्थितीला आपल्याप्रमाणे बदलण्याचा प्रयत्न अभिजित कुंभारने केला. त्याच्या यशाने गावाने आनंदोत्सव साजरा केला.
कोणतीही गोष्ट अशक्य नसते. पण त्यासाठी प्रचंड मेहनत घेतानाच, धीर धरावा लागतो. अपयश आल्यानंतर खचून न जाता पुन्हा प्रयत्न केला, तर यश मिळवता येते. - अभिजित कुंभार