तासगाव : येथील अग्रणी फाउंडेशनकडून मोफत ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन्स उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
सावळज प्राथमिक आरोग्य केंद्रास शुक्रवारी उपविभागीय पोलिस अधिकारी अश्विनी शेंडगे, फाउंडेशनचे अध्यक्ष राजीव मोरे यांच्या उपस्थितीत कॉन्सन्ट्रेटर मशीन्स देण्यात आल्या. आता कोरोना रुग्णांना मोफत ऑक्सिजनची सोय होणार आहे.
यावेळी पोलीस अधिकारी शेंडगे म्हणाल्या की, सध्याचा काळ कठीण आहे. अग्रणी फाउंडेशन आणि राजीव मोरे यांनी सामाजिक जबाबदारी ओळखून ग्रामीण भागात ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन दिल्या आहेत. या मशीन शेकडो जीव वाचवण्याचे काम करतील. अशाप्रकारे समाज आणि प्रशासन एकत्र आले तर नक्कीच आपण कोरोनाला हरवू.
राजीव मोरे म्हणाले की, अग्रणी फाउंडेशनच्या वतीने या मशीन्स आरोग्य केंद्राला केवळ जबाबदारी म्हणून दिल्या आहेत. यापुढेही कोरोनाबाबत काही अडचणी आल्या तर आम्ही सर्व कार्यकर्ते उपलब्ध असू.
यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अनिल सूर्यवंशी, सावळजचे उपसरपंच संजय थोरात, विजय पाटील, अजिंक्य पाटील, मंगेश बुधवले, डॉ. प्रमोद भोसले, डॉ. आरती शेळके आदी उपस्थित होते.