सांगली : नाशिक येथील दुर्घटना ताजी असतानाच आता जिल्ह्यातील रुग्णालयांनीही ऑक्सिजन पुरवठ्याच्या कारणावरून जबाबदारी झटकण्यास सुरुवात केली आहे. ऑक्सिजन संपत आला आहे. तुम्ही रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात हलवू शकता, असे सांगत नातेवाईकांकडून लेखी पत्रही लिहून घेतले जात आहे. संकटाच्या या काळात रुग्णालयांनीही हात वर केल्याने नातेवाईक हवालदिल झाले आहेत.
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. दररोज हजारहून अधिक रुग्ण सापडत आहेत. शासकीय, खासगी रुग्णालये हाऊसफुल्ल झाली आहेत. ऑक्सिजन, व्हेंटिलेंटर बेडसाठी नातेवाईकांची धावाधाव सुरू आहे. कोरोनाची परिस्थिती दिवसेदिवस गंभीर बनत चालली आहे. उपचाराविना एकही रुग्ण राहू नये, असे आदेशही जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. त्यात ऑक्सिजनचा तुटवडा जाणवू लागला आहे. नाशिक येथे ऑक्सिजनच्या गळतीमुळे २२ रुग्णांचा मृत्यू झाला. या घटनेची खासगी रुग्णालयांनी धास्ती घेतली आहे.
जिल्ह्यातील खासगी रुग्णालयेही आता जबाबदारी झटकू लागली आहे. ऑक्सिजनचा साठा सायंकाळपर्यंत पुरेल इतकाच असल्याचे या खासगी रुग्णालयाकडून सांगण्यात येत आहे. त्यात आता या रुग्णालयांनी नातेवाईकांकडून लेखी पत्रही लिहून घेण्यास सुरुवात केली आहे. रुग्णालयातील ऑक्सिजनचा साठा संपत आला आहे. तुम्ही रुग्णांची ऑक्सिजन असलेल्या रुग्णालयात व्यवस्था करू शकता. आमची त्याबाबत तक्रार नाही, असे म्हणत नातेवाईकांना इतर पर्यायांचा शोध घेण्याचीच सूचना रुग्णालय प्रशासनाकडून केली जात असल्याचा प्रकार घडत आहेत. त्यामुळे ऑक्सिजन साठा उपलब्ध असलेल्या रुग्णालयांचा शोध घेण्यासाठी नातेवाईकांची धावाधाव सुरू झाली आहे. एकूणच रुग्णालयाच्या या प्रकारामुळे नातेवाईक मात्र हतबल झाल्याचे चित्र आहे.