लेाकमत न्यूज नेटवर्क
सांगली : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना, ऑक्सिजनची मागणीही वाढत आहे. त्यामुळे रुग्णांना ऑक्सिजन मिळावा यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून एक कोटी ३२ लाख रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या सांगलीच्या शासकीय रुग्णालयातील द्रवरूप ऑक्सिजन प्लांट सुरू झाला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली.
जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी सांगितले की, रुग्णांना ऑक्सिजनचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी पालकमंत्री जयंत पाटील यांनी सांगलीच्या शासकीय रुग्णालयातही ऑक्सिजन प्रकल्प सुरू करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून एक कोटी ३२ लाख रुपये देण्यात आले होते. सोमवारी रुग्णालय परिसरात उभारण्यात आलेल्या टँकमध्ये बारा टन द्रवरूप ऑक्सिजन भरण्यात आला आहे.
शासकीय रुग्णालयासाठी प्रतिदिन अर्धा ते एक टन ऑक्सिजनची आवश्यता असते. त्यामुळे एकदा द्रवरूप ऑक्सिजन टँक पूर्ण क्षमतेने भरल्यास सिव्हिल हॉस्पिटलला अंदाजे १७ ते १८ दिवस ऑक्सिजन पुरणार आहे. सिव्हिल हॉस्पिटलमधील या द्रवरूप ऑक्सिजन प्लांटमुळे जिल्ह्यातील ऑक्सिजन साठवण क्षमतेत वाढ झाली असल्याचेही जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी सांगितले.
दरम्यान, सोमवारी सकाळी पोलीस बंदाेबस्तात ऑक्सिजनचा टँकर सांगलीत दाखल झाला. त्यानंतर रुग्णालय प्रशासनाने तो उभारण्यात आलेल्या टँकमध्ये सुरक्षितपणे भरून घेतला. यावेळी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नंदकिशोर गायकवाड, डॉ. मनोज पवार, पी. आर. पाटील, महेश होवाळ, मुनीर पठाण प्रशांत मोहिते आदी उपस्थित होते.
चौकट
तीनशे बेडना ऑक्सिजनची सोय
जिल्हा शासकीय रुग्णालयातील रुग्णांसाठी ऑक्सिजनची सोय करण्यासाठी मोठ्या प्रकल्पाची मागणी होत होती. अखेर जिल्हा प्रशासनाने नियोजन समितीच्या माध्यमातून निधी दिल्याने प्रकल्पास गती मिळाली आहे. या रुग्णालयात ३०० बेडना ऑक्सिजनची सोय होणार आहे. सध्या रुग्णसंख्या स्थिर असली तरी भविष्यात कोविड आणि नॉनकोविड रुग्णांवर उपचारासाठी या सुविधेचा लाभ होणार आहे.