सभेच्या अजेंड्यावर २० व्हेंटिलेटर्स खरेदीसाठी सुमारे ७८ लाख रुपये खर्चाला मान्यता देण्याचा विषय होता. व्हेंटिलेटर्स खरेदीसाठी जी कंपनी प्रशासनाने निश्चित केली आहे, त्या कंपनीचे व्हेंटिलेटर्स प्रभावी आहेत का? कोणत्या रुग्णालयात त्यांच्या व्हेंटिलेटर्सचा वापर होतो? असे प्रश्न सदस्यांनी उपस्थित केले. या कंपनीबरोबरच इतर कंपन्यांची देखील कोटेशन्स मागवावीत, मगच व्हेंटिलेटर्स खरेदी करावेत, असे मत व्यक्त करत व्हेंटिलेटर्स खरेदीला ब्रेक लावला.
ऑक्सिजन प्लॅन्ट उभारणीबाबतही सदस्यांनी विरोधाचा सूर आळवला. प्रशासनाने नंदुरबार, नवी मुंबई व सिंधुदुर्ग येथे ऑक्सिजन प्लॅन्ट बसविलेल्या कंपनीला मिरजेत ऑक्सिजन प्लॅन्ट उभारणीला मान्यता देण्याचा प्रस्ताव दिला होता. पण स्थायी सदस्यांनी त्यालाही विरोध केला. सांगली, मिरजेत शासकीय रुग्णालयात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून ऑक्सिजन प्लॅन्ट बसविण्याचे काम सुरू आहे. प्रशासनाने शिफारस केलेली कंपनी व शासकीय रुग्णालयात काम करत असलेल्या कंपनीत तफावत जाणवते. संबंधित कंपनी, किती दिवसात प्लॅन्ट उभा करणार, याबाबतची माहिती देत नाही. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत ऑक्सिजन प्लँट उभारणीसाठी कंपन्यांचे कोटेशन मागवूनच प्लॅन्ट उभा करावा, अशा सूचना सदस्यांनी केल्या. त्यामुळे सभापती पांडुरंग कोरे यांनी व्हेंटिलेटर्स खरेदी व ऑक्सिजन प्लँट उभारणीचे विषय सभेत फेटाळून लावले.
चौकट
आधी मंजुरी, आता विरोध
सप्टेंबर महिन्यात मेडिसॅम बायोमेडिकल सिस्टिम या कंपनीकडून ५ व्हेंटिलेटर्स खरेदी करण्यास स्थायी समितीने मंजुरी दिली होती. सध्याची कोरोना लाट पाहता प्रशासनाने याच कंपनीकडून आणखी २० व्हेंटिलेटर्स खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. कंपनीनेही जुन्या दरानेच व्हेंटिलेटर्स देण्याची तयारी दर्शविली होती. पण स्थायी समितीने हा प्रस्तावही फेटाळून लावला.