लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या वतीने महापालिका क्षेत्रातील विविध रुग्णालयांत दाखल असलेल्या रुग्णांच्या नातेवाइकांसाठी मोफत भोजन व ऑक्सिजनची सेवा देण्यात येत आहे. त्याचा प्रारंभ सोमवारी (दि. २६) सांगलीत करण्यात आला.
संघटनेचे संस्थापक नितीन चौगुले म्हणाले की, महापुरावेळी आम्ही सलग ४० दिवस नागरिकांना मदत वाटप केली होती. महापुरानंतर कोरोनाचे संकट समाजावर आले आहे. या काळात श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानतर्फे महापालिका क्षेत्रातील कोविड हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या रुग्णांच्या नातेवाइकांना जेवणाचे डबे पोहोच करण्याचे कार्य आम्ही कर्तव्यभावनेतून करणार आहोत. सॅनिटायझर, मास्क व ग्लोव्हजचे वाटपही करण्यात येणार आहे. ऑक्सिजनची गरज असलेल्या रुग्णाला मोफत ऑक्सिजन सेवा देणार आहोत. यासाठी वैद्यकीय पथक तयार केले आहे.
दानशूर व्यक्तींकडून १५ सिलिंडर मिळाले आहेत. अजून ५० ते ६० सिलिंडर उपलब्ध करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. कल्याणमध्ये कोविड हॉस्पिटल सुरू करणार असून त्याला मान्यता मिळाली आहे. मे महिन्यापासून १८ वर्षांवरील सर्वांना मोफत लस दिली जाणार आहे. लस घेतल्यानंतर ६० दिवस रक्तदान करता येणार नाही. त्यामुळे लस घेण्यापूर्वी एकदा तरी रक्तदान करण्याची गरज आहे, असे चौगुले म्हणाले. यावेळी आनंदराव चव्हाण, प्रकाश निकम, डॉ. संकेत दिवाण, प्रदीप पाटील, सुरेंद्र इंगळे, सचिन देसाई, सचिन मोहिते, भूषण गुरव, जयदीप चेंडके उपस्थित होते.