कुपवाड : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील विविध औद्योगिक क्षेत्रातील ऑक्सिजन लागणाऱ्या इंजिनिअरिंगसह इतर उद्योगांचा ऑक्सिजन पुरवठा शासनाने बंद केला होता. सध्या कोरोना रुग्णवाढीचे प्रमाण कमी झाले आहे. यामुळे आज दि. २ जूनपासून टप्प्याटप्प्याने ऑक्सिजन पुरवठा होणार आहे, अशी माहिती कृष्णा व्हॅली चेंबर ऑफ इंडस्ट्रीज अँड काॅमर्सचे अध्यक्ष सतीश मालू यांनी पत्रकारांना दिली.
जिल्हा पुरवठा अधिकारी व जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक यांच्यात मंगळवारी बैठक झाली. या बैठकीत उद्योगाला ऑक्सिजन पुरवठ्याचा निर्णय झाला आहे. या बैठकीनंतर मालू म्हणाले की, जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली होती. कोरोना महामारीत ऑक्सिजनअभावी रुग्ण दगावले होते. त्यामुळे शासनाने १४ एप्रिलपासून जिल्ह्यातील उद्योगक्षेत्राचा ऑक्सिजन पुरवठा बंद करून तो आरोग्यासाठी वापरण्याचे आदेश काढले होते. त्यामुळे अनेकांचे जीव वाचले. जिल्ह्यातील फॅब्रिकेशन, फौड्री, इंजिनिअरिंग यासह इतर उद्योगांना लागणारा ऑक्सिजन गॅस पुरवठा जिल्हा प्रशासनाने बंद केला होता. औद्योगिक क्षेत्रातील अनेक उद्योग बंद होते. यामुळे जिल्ह्यातील उद्योगांचे मोठे नुकसान झाले होते.
सध्या जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. प्राणवायूची मागणीही कमी होऊ लागली आहे. म्हणून जिल्ह्यातील उद्योगक्षेत्राचा ऑक्सिजन पुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी कृष्णा व्हॅली चेंबरचे अध्यक्ष सतीश मालू यांनी जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्याकडे केली होती. त्या मागणीचा तातडीने विचार होऊन जिल्हाधिकारी यांचे आदेशानुसार जिल्हा पुरवठा अधिकारी व जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक यांची बैठक झाली.
या बैठकीत जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या व कृष्णा व्हॅली चेंबरने केलेल्या मागणीचा विचार होऊन जिल्ह्यातील उद्योगांना पूर्वीप्रमाणेच बुधवारपासून टप्प्याटप्प्याने ऑक्सिजन गॅसचा पुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे कृष्णा व्हॅली चेंबरच्या मागणीला यश आले असून जिल्ह्यातील उद्योगक्षेत्र गतिमान होणार आहे.