अविनाश बाड - आटपाडी -कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयीन शिक्षणासाठी आटपाडीत दररोज येणाऱ्या हजारो युवक-युवतींना सडकसख्याहरी आणि फाळकूट दादांचा भयानक त्रास होऊ लागला आहे. बसस्थानक ते महाविद्यालय रस्ता, महाविद्यालयाच्या परिसरात युवतींचा पाठलाग करुन त्यांची टिंगल-टवाळी, अश्लील हावभाव करण्यापर्यंत या सडकछाप हिरोंची मजल गेली आहे. खेड्यातून आलेल्या युवकांना इथल्या देवदासांकडून मारहाण करण्याचे प्रकार वाढले आहेत. पोलिस याकडे दुर्लक्ष करतात.संपूर्ण आटपाडी तालुका, सांगोला (जि. सोलापूर) तालुक्याच्या पश्चिम भागातून दररोज कला, विज्ञान, वाणिज्य, संगणक अशा विविध शिक्षणासाठी खेड्यातून युवक-युवती आटपाडीत एसटीने येतात. सकाळी ७.३० पासून महाविद्यालयातील अनेक वर्ग सुरू होतात. आटपाडीत अनेक विषयांचे खासगी क्लासेस आहेत. महाविद्यालयाच्या वेळेनुसार जुळवून घेण्यासाठी तेही सकाळपासूनच सुरू होतात. आटपाडीतील मुले दुचाकीवर सकाळी गॉगल घालून चित्रपटातील गुंड वाटावेत, अशी वेशभूषा केलेल्या आणि टाईट टी शर्ट घातलेल्या तरुणांची टोळकी बसस्थानकापासून, तर काही ग्रामपंचायत चौकापासून युवतींचा पाठलाग करीत आहेत. ग्रामपंचायत चौक ते महाविद्यालय हा रस्ता अत्यंत घातक ठरत आहे. अत्यंत वर्दळीच्या या रस्त्यावर वेगाने दुचाकीवरुन येऊन मुलींना भीती दाखविणे, मोठ्याने हसणे आणि विकृत हावभाव करुन चिडविणे असा उद्योग दररोज सुरू आहे. अलीकडे या प्रकारात वाढ झाली आहे. सकाळी साडेसात वाजता सुरू झालेल्या महाविद्यालयाची साडेबाराला सुट्टी होते. तसेच दुपारी ११ वाजता भरलेले महाविद्यालय सायंकाळी ५ वाजता सुटते. महाविद्यालयाच्या मधल्या सुट्टीच्या काळात बहुतांशी विद्यार्थी पटांगणात असतात. तेव्हा शिक्षण घेत नसलेले विद्यार्थी महाविद्यालय परिसरात जाऊन हिरोगिरी करीत आहेत. या सडकसख्याहरींच्या छोट्या-छोट्या टोळ्या बनल्या आहेत. त्यामुळे खेड्यातील तरुण-तरुणींना आटपाडीत शिक्षणासाठी येणे कठीण झाले आहे. महाविद्यालयाचे पोलिसांना पत्रसकाळी महाविद्यालयात येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त असते. मधल्या सुट्टीत बहुसंख्येने विद्यार्थी मैदानावर असतात. यावेळी महाविद्यालयात प्रवेशित नसलेल्या गुंड प्रवृत्तीच्या युवकांकडून महाविद्यालयातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना मारहाणीचे प्रकार घडत आहेत. महाविद्यालय परिसर व प्रवेशद्वाराजवळ मुलींना त्रास व शेरेबाजी करण्याचे प्रकार घडत आहेत. भांडणे होत आहेत. पोलिसांनी अशा प्रकारचा त्रास देणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या युवकांचा बंदोबस्त करावा, असे पत्र श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष कारंडे यांनी आटपाडी पोलीस ठाण्यात दिले आहे.
फाळकूट दादांमुळे आटपाडीकर त्रस्त
By admin | Published: December 14, 2014 10:39 PM