सांगली : संभाव्य पूर आणि अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पूरपट्टयातील अडीच हजार कुटुबांना महापालिकेने स्थलांतराची नोटीस बजावली आहे. यामध्ये कर्नाळरोड, सूर्यवंशी प्लॉट, दत्तनगर, मगरमच्छ कॉलनी, सांगलीवाडी, गावभाग, हरिपूर रोड, काळीवाटसह शामरानगर परिसराचा समावेश आहे. २०१९ च्या महापुरामध्ये दुकाने, घरामध्ये पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले.
सांगली व मिरजेतील तब्बल ४२ हजारावर कुटूबांना फटका बसला होता, तर २०२१ च्या महापूरामध्ये ३२ हजारावर कुटूंंबे स्थलांतरीत झाली होती. कृष्णा नदीची पातळी आयर्विन पुलाजवळ ३२ फूट झाल्यानंतर सांगलीतील सुर्यवंशी प्लॉटमध्ये पाणी शिरण्यास सुरवात होते. तर ३५ फूटाला संपूर्ण कर्नाळ रस्ता पाण्याखाली जातो. दरम्यान महापूराचा अनुभव लक्षात घेत दरवर्षी पावसाळा सुरु झाला की महापालिका प्रशासनाच्या वतीने पुरपट्ट्यातील नागरिकांना नोटीस बजावते.
महापालिकेने जून महिना सुरु होताच नोटीस बजाविण्यास सुरूवात केली आहे. पूरपट्ट्यातील अडीच हजार कुटूंबांना नोटीस बजाविली जाणार आहे. आतापर्यंत १ हजार १४० कुटूंबांना नोटीस देण्यात आल्या आहेत. उर्वरित नोटीस वाटपांचे काम युध्दपातळीवर सुरु आहे. ४५ फुटापर्यंत पाणी पातळी लक्षात घेत संबंधित परिसरातील कुटूंबांना नोटीस बजाविण्याचे काम सुरु आहे.
भरपाई मिळणार नाही
महापालिकेने पुरपट्ट्यातील कुटूंबाना दिलेल्या नोटीशीत महापूर काळात नुकसान झाल्यास भरपाई मिळणार नाही असेही म्हटले आहे. नोटीस वाटपाचे काम पूर्ण झाल्यानंतर जनजागृतीची मोहिम हाती घेतली जाणार आहे.