मांगले : शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागात आठवड्यावर आलेला भात पेरणीचा हंगाम अडचणीत सापडला आहे. कोरोनाच्या अनुषंगाने कडक लॉकडाऊन असल्याने शेतीसाठी लागणारे बी-बियाणे व खतांची दुकाने गेल्या १५ दिवसांपासून बंद असल्यामुळे धूळवाफ भात पेरणीला भाताचे बियाणे आणायचे कोठून, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे प्रशासनाने कडक लॉकडाऊन जाहीर केले. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने गेल्या १५ दिवसांपासून बंद आहेत. लॉकडाऊनचा कालावधीही वाढत चालला आहे. यामध्ये खरीप हंगाम आठवड्यावर येऊन ठेपला आहे. तरी गावोगावची दुकाने बंद असल्याने बियाण्यांची ऑर्डरच दिलेली नाही. त्यामुळे बी-बियाणे, खताची दुकाने बंद आहेत. होलसेल बियाणे विक्रीची दुकाने बंद असल्यामुळे ग्रामीण भागातीत किरकोळ बी-बियाणे दुकानांमध्ये विक्रीसाठी बियाणे आणण्यात आलेले नाही. त्यामुळे खरीप हंगाम संकटात सापडला आहे. याचा प्रशासनाने विचार करून शेती संबंधित बाबीची दुुकाने खरीप हंगामाच्या तोंडावर अत्यावश्यक सेवेप्रमाणे सुरु ठेवण्याची गरज आहे. कोरोना प्रतिबंधात्मक नियमांना अधिन राहून खरीप हंगामाच्या तोडांवर बी-बियाण्याची दुकाने सुरु करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
कोट
शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागात व नदीकाठी भातपेरणी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर केली जाते; मात्र बी-बियाणे उपलब्ध नसल्याने शेतकरी अडचणीत आहेत. यासाठी आम्ही वरिष्ठ पातळीवर संपर्क साधून कृषी दुकाने सुरू राहावीत, यासाठी प्रयत्न करत आहोत.
- गणपती पाटील
तालुका कृषी अधिकारी