सांगली : पलूस व शिरोळ पंचायत समितीला अनुक्रमे २०१२ आणि २०१४ यावर्षी पुरवठा केलेले स्प्रेपंप हे ‘चायना मेड’ असून ते बॅटरी आॅपरेटेड असल्याचा जिल्हा परिषद कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांचा खुलासा पूर्णत: चुकीचा आणि पदाधिकाऱ्यांची दिशाभूल करणारा आहे. वास्तविक पाहता पडगीलवार सुध्दा ‘चायना मेड’च बॅटरी स्प्रेपंप पुरवठा करणार आहेत, असा आरोप जिल्हा परिषदेतील काँग्रेसचे पक्षप्रतोद सुरेश मोहिते यांनी पत्रकार परिषदेत बुधवारी केला.ते पुढे म्हणाले की, बॅटरी स्प्रेपंपासाठीचे साहित्य हे बहुतांशी कंपन्यांचे ‘चायना मेड’च आहे. यापूर्वी शिरोळ (जि. कोल्हापूर) आणि पलूस पंचायत समित्यांना बॅटरी स्प्रेपंप पुरवठा केला आहे. ते ‘चायना मेड’ होते, हे अधिकाऱ्यांना आता सुचले आहे. पूर्वी त्यांनी या प्रकरणाची का तपासणी केली नाही? शिवाय, सध्या जिल्हा परिषदेला पुरवठा झालेले स्पे्रपंप हे चांगल्या दर्जाचे व बॅटरी आॅपरेटेड कम हँड आॅपरेटेड (डबल आॅपरेटेड) आहेत, असे अधिकारी सांगत आहेत. म्हणून मी स्वत: सांगलीतील काही दुकानांमध्ये पडगीलवार यांनी दिलेल्या बॅटरी स्प्रेपंपांच्या दराची चौकशी केली. यावेळी दोन दुकानदारांनी प्रति नग ३६ रूपये दराने ते देण्याची तयारी दर्शविली आहे. खरेदी समिती आणि जिल्हा कृषी विकास अधिकाऱ्यांनी सांगली शहरातील काही दुकानदारांकडे दराची चौकशी केली असती, तर दरातील फरक त्यांना कळला असता. परंतु, खरेदी समिती आणि जिल्हा कृषी विकास अधिकाऱ्यांनी याकडे पूर्णत: दुर्लक्ष केल्यामुळेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना महागडे बॅटरी स्प्रेपंप घ्यावे लागले आहेत. तसेच शासनाचेही लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. याला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे. अधिकाऱ्यांच्या गैरकारभाराचा पुराव्यासह जिल्हा परिषद सभेत पंचनामा करणार आहे, असा इशाराही सुरेश मोहिते यांनी दिला आहे.ते पुढे म्हणाले की, स्वीय निधीतील पैशावर डल्ला मारण्याचे उद्योग अधिकाऱ्यांनी बंद करावेत. सर्वसामान्यांच्या करातून हे पैसे जमा होत असल्यामुळे अधिकाऱ्यांनी कोणतेही साहित्य खरेदी करायचे असेल, तर त्याची काळजीपूर्वक तपासणी केली पाहिजे. जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यास त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. (प्रतिनिधी)आष्टा, इस्लामपूर पालिकांनी पैसे भरण्याचे आदेशजिल्हा परिषदेला शैक्षणिक कराच्या माध्यमातून आष्टा नगरपालिकेकडून ३५ लाख ९८ हजार ७४५ रूपये आणि इस्लामपूर नगरपालिकेकडे ७३ लाख २६ हजार ९७७ रूपये थकित आहेत. या थकबाकीचा प्रश्न महालेखापालांनी उपस्थित करून, नगरपालिकांना दि. ३१ मार्चअखेर सर्व रक्कम भरण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे सर्व रक्कम मिळेल, असा विश्वासही सुरेश मोहिते यांनी व्यक्त केला आहे.झेडपीला १६ कोटी रुपये मिळणारराज्य शासनाकडे कराचे थकित आठ कोटी ४६ लाख रूपये मिळणार आहेत. तसेच उर्वरित पाणीपट्टी कराची पाटबंधारे विभागाने कपात केलेली रक्कमही त्यांच्याकडून मिळणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचे अंदाजपत्रक वाढण्याची शक्यता आहे, असे मत सुरेश मोहिते यांनी व्यक्त केले.जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडील कर्मचाऱ्यांना बारा वर्षानंतर मिळणारी पदोन्नती देण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
पडगीलवार यांचे बॅटरी स्प्रेपंप ‘चायना मेड’च
By admin | Published: March 17, 2016 12:18 AM