पलूस : माजी मंत्री आमदार डॉ.विश्वजित कदम व स्वप्नाली विश्वजित कदम यांनी पलूस येथे आयोजित केलेल्या कृष्णाई नवरात्र महोत्सवात पुण्याच्या पद्मश्री शीतल महाजन यांनी नऊवारी साडी आणि मराठमोळा साज करत पॅरामोटरच्या साहाय्याने चार हजार फुटांवरून पॅराजम्पिंग केले. नारिशक्तीला प्रेरणा देण्याच्या उद्देशाने शीतल महाजन हिने हे साहस केले.
यावेळी पॅरामोटरचे पायलट असलेल्या चंद्रकांत महाडिक यांच्या पॅरामोटारमधून शीतल महाजन या आकाशात चार हजार फुटांवर उंच गेल्या. त्या ठिकाणी पॅरामोटारमधून शीतल यांनी आकाशात झेप घेतली. जमिनीच्या दिशेने वेगात येत असतानाच तीन हजार फूट उंचीवर पॅराशूट उघडले. यावेळी हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या महिलांची गर्दीत असलेल्या मैदानावरच्या रिकाम्या जागेत त्यांनी यशस्वी लँडिंग केले.
यावेळी उपस्थित महिलांनी टाळ्यांच्या गजरात शीतल महाजन यांचे स्वागत केले. शितल महाजन या भारती विद्यापीठाच्या पुणे येथील यशवंतराव मोहिते महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थीनी आहेत. मागील आठवड्यात डॉ.पतंगराव कदम यांच्या "लोकतीर्थ" या स्मारकाच्या दर्शनासाठी आल्या होत्या.
यावेळी माजी मंत्री आमदार डॉ.विश्वजित कदम यांच्या आग्रहास्तव कृष्णाई नवरात्र महोत्सव कार्यक्रमात पलूस येथे पॅराजम्पिंग करण्याचा निर्धार केला होता. त्याप्रमाणे शीतल महाजन यांनी नऊवारीत पॅरामोटारमधून पॅराजम्प करून दुसऱ्यांदा राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला आहे.यापूर्वी २०२२ मध्ये पुणे येथे ५ हजार फूट उंचीवरून त्यांनी नऊवारीत यशस्वी स्काय डायव्हिंग केले आहे.
आज पलूस ४ हजार फुटावरून उडी घेतल्यानंतर शितल महाजन यांनी सुरक्षित लँडिंग केल्यावर आमदार डॉ.विश्वजित कदम, स्वप्नाली कदम, विजयमाला कदम, खासदार विशाल पाटील, महेंद्र लाड व शांताराम कदम यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी "माझं गाव पलूस कडेगाव" लिहलेला बॅनर शितल महाजन यांनी झळकविला.
ही उडी नारीशक्तीसाठी : शितल महाजन
"पॅरामोटर मधून पराशूटच्या सहाय्याने उडी घेऊन महिलांच्या प्रचंड गर्दीत असलेल्या रिकाम्या जागेत यशस्वीपणे खाली उतरणे महत्वाचे होते.अशा प्रकारे गर्दीत उतरण्याचे साहस मी पहिल्यांदाच केले. यामुळे ही कामगिरी माझ्यासाठी अविस्मरणीय आहे कारण ही उडी "नारीशक्ती'साठ प्रेरणादायी ठरेल असे यावेळी शितल महाजन म्हणाल्या.