कोकरुड : गेले चार दिवस कोल्हापूर, रत्नागिरीला जोडणाऱ्या कोकरुड-नेर्ले पुलावर पाणी येऊन नव्याने करण्यात आलेला राज्यमार्ग खचला. पाणी उतरताच ठेकेदाराने या रस्त्यावर भराव टाकण्यास सुरुवात केली आहे. वाकुर्डे खिंडीतील दरड बाजूला करण्यात आली आहे.
गेल्या पाच-सहा दिवसांपासून पडणाऱ्या पावसाने वारणा नदीला पूर आला आहे. कोल्हापूर, रत्नागिरीला जोडणाऱ्या कोकरुड-नेर्ले पुलावर मोठ्या प्रमाणात पाणी आले होते. विजापूर-गुहागरला जोडणाऱ्या या रस्त्याचे काम एक महिन्यापूर्वी नव्याने करण्यात आले होते. मात्र, गुरुवारी पुराच्या पाण्याने हा राज्यमार्ग खचला. त्यामुळे येथील वाहतूक पूर्ण बंद करून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. रविवारी सकाळी नदीची पाणीपातळी कमी झाल्याने ठेकेदाराने खचलेल्या ठिकाणी भराव टाकण्यास सुरुवात केली. चार दिवसांत हा रस्ता वाहतुकीसाठी खुला हाेईल, असे सांगण्यात आले. येळापूर-शिराळा मार्गावर वाकुर्डे बुद्रुक खिंडीत दरड कोसळल्याने हा रस्ता बुधवारपासून बंद होता. रविवारी दुपारी तो खुला करण्यात आल्याने वाहतूक सुरू झाली आहे.