उंब्रज : ‘येळकोट येळकोट, जय मल्हारऽऽ’, ‘सदानंदाच्या नावानं चांगभलंऽऽ’च्या जयघोषात, पिवळ्या धमक भंडाºयाची उधळण करत रविवारी सूर्यास्ताच्या साक्षीने गोरज मुहूर्तावर खंडोबा व म्हाळसा यांचा शाही विवाह सोहळा पालनगरीत पार पडला. या सोहळ्यास तारळीनदीच्या काठावर आठ लाख वºहाडी जमली होती.
शाही विवाह सोहळ्यास रविवारी सकाळी मुख्य मानकरी देवराज पाटील यांच्या वाड्यातून परंपरेनुसार सुरुवात झाली. देवराज पाटील हे खंडोबा व म्हाळसा यांचे मुखवटे आणण्यासाठी रथातून देवळाकडे निघाले. त्यावेळी रथाबरोबर कोल्हापूर येथील चोपदार यांचा मानाचा घोडा होता. मिरवणुकीत फुलांचे छत्र्याधारी, आरसेधारी, ढोलवादक, काठीचे मानकरी पालखीसह समाविष्ट झाले. पाल येथील पाटील घराण्यातील चार मानकरी मिरवणुकीत रुखवत घेऊन सहभागी झाले.
मिरवणूक वाजत गाजत भंडाºयाची उधळण करत तारळीनदीच्या पात्रातील मिरवणूक मार्गावरून देवळाकडे आली. यावेळी सात ते आठ लाख उपस्थित वºहाडींनी ‘येळकोट येळकोट जय मल्हार... सदानंदाच्या नावानं चांगभलं...’ असा जयघोष केला.
मिरवणूक देवळात पोहोचल्यानंतर रथातून मुख्य मानकरी खाली उतरले. तेथून ते देवळाच्या मुख्य गाभाºयात गेले. तेथे त्यांनी खंडोबा व म्हाळसा यांच्या मुखवट्यांचे विधिवत पूजन केले. त्यानंतर हे मुखवटे मुख्य मानकरी देवराज पाटील यांच्या पोटाशी बांधण्यात आले. ते देवळातून बाहेर आले. मानाच्या शिवणीच्या गाड्यात बसले. त्यानंतर मुख्य दरवाजात आल्यानंतर परत ते रथात बसले. खंडोबा व म्हाळसाचे मुखवटे घेऊन ही मिरवणूक लग्नाच्या बोहल्याकडे निघाली. मिरवणुकीत रेठरे, उंब्रज, कºहाड, नुने, शिवणी, पालसह दहा गावांतील गाडे मानकºयांसह समाविष्ट झाले. तसेच सात गावांच्या पालख्या व त्यांचे मानकरी, २५ गावांच्या सासनकाठ्या व त्यांचे मानकरीही समाविष्ट झाले.
शाही मिरवणुकीने तारळी नदीतील मार्गावरून नदी पार करून बोहल्यावर गेली. यावेळी केलेल्या भंडाºयाच्या उधळणीने परिसर पिवळा धमक बनला. सूर्यास्ताची वेळ असल्यामुळे सूर्याची किरणे व भंडारा यामुळे या परिसराला सोन्याहून पिवळा साज चढला होता. अभूतपूर्व वातावरणात गोरजमुहूर्तावर खंडोबा व म्हाळसा यांच्या मुखवट्यांचा शाही विवाह झाला. विवाहावेळी जमलेले लाखो वºहाडी मंडळींकडून खोबºयाच्या तुकड्यासह भंडाºयाची उधळण करण्यात आली.
चौकट
शाही विवाहास उपस्थित राहण्यासाठी वºहाडी पाल येथे आदल्या दिवशी गर्दी करतात. विवाह सोहळ्याबरोबर देवळात जाऊन खंडोबा व म्हाळसा यांच्या मूर्तीचे दर्शन घेणे ही त्यांच्यासाठी महत्त्वाचे असते. पाल ते काशीळ हा मुख्य रस्ता आदर्शनगर गावाच्या पुढील बाजूस पोलिस बंद करतात. त्या परिसरात वाहने लावून भाविक चालत जातात. रविवारी पहाटे दोनच्या सुमारास तेथे सर्व गाड्यांबरोबर पुणे पासिंगच्या चार चाकी गाड्याही येथील नाक्यावर पोलिसांनी अडवल्या. या गाडीत एक नेता होता. सुरुवातीला खूप गोड भाषेत त्याने पोलिसांना विनंती केली; पण पोलिसांनी त्याला जुमानले नाही. त्यानंतर त्याने चक्क पैसाचे आमिष दाखवलेल; पण थंडीत गारठलेल्या या पोलिसांनी गाडी सोडली नाही. याच रस्त्यावर पाल गावाच्या मुख्य कमानीजवळ पोलिसांची दुसरी चौकी होती. तेथेही पोलिस सतर्क होते. परंतु या ठिकाणी कर्तव्यावर असलेले एक पोलिस उपनिरीक्षक दर्जाचे अधिकारी मात्र रस्त्यालगत स्वत:ची चारचाकी गाडी लावून उबदार रजई घेऊन त्या गाडीत निवांत झोपलेले आढळून आले. एकीकडे कर्मचारी थंडीत गारठून कर्तव्य पार पाडत होते. तर दुसरीकडे अधिकारी मात्र उबदार रजई पॅकबंद गाडीत झोपून आपले कर्तव्य निभावत होते. यामुळे यात्रेकरूंमधून नाराजी व्यक्त होत आहे.
कडेकोट पोलिस बंदोबस्त
पिवळ्याधमक भंडाºयाच्या उधळणीबरोबर सूर्यास्ताच्या साक्षीने या शाही विवाह सोहळ्यास उपस्थित वºहाडींनी सरत्या वर्षाला निरोप दिला. शाही विवाह सोहळा शांततेत पार पाडण्यासाठी पोलिस प्रशासन, देवस्थान ट्रस्ट, ग्रामपंचायत पाल यासह पाल ग्रामस्थांनी केलेल्या उपाययोजनेला यश मिळाले.