अशुतोष कस्तुरेपलूस : पलूस तालुक्यामध्ये २००५ मध्ये आलेल्या महापुरामध्ये मोठी हानी झाली. नदीकाठच्या गावांना पुराचा धोका ओळखून तत्कालीन पुनर्वसन व मदतकार्यमंत्री डॉ. पतंगराव कदम यांच्या पुढाकाराने, नदीकाठची जमीन वाहून जाऊ नये, यासाठी तालुक्यात गावोगावी पूरसंरक्षक भिंती उभारण्यात आल्या. यंदा पाण्याचा प्रचंड विसर्ग होऊनही या भिंतींच्या परिसरातील मंदिरे, स्मशानभूमी सुरक्षित राहिल्या.
कृष्णा नदीकाठी असणाऱ्या पूरसंरक्षक भिंतीमुळे यंदाच्या महापुरात काहीसा दिलासा मिळाला. ज्या भागात या भिंती बांधण्यात आल्या आहेत, त्या भागातून नदीचा मुख्य प्रवाह येतो. या प्रवाहाची तीव्रता या पूरसंरक्षक भिंतींमुळे काहीअंशी कमी झाली. पलूस तालुक्यात आमणापूर, बुर्ली, दह्यारी, भिलवडी, धनगाव, नागठाणे, औदुंबर, खोलेवाडी, राडेवाडी या गावांमध्ये पूरसंरक्षक भिंती उभारल्या आहेत. या भिंतींमुळे कृष्णा नदीचा प्रवाह वेगवान असूनही नदीकाठची मंदिरे, इमारती, स्मशानभूमीस धोका पोहोचला नाही.
कृष्णा नदी पलूस तालुक्यात तुपारीपासून दक्षिणवाहिनी आहे. दह्यारी, घोगाव, दुधोंडीपर्यंत ती छोटी वळणे घेत येते. येथून पुढे पुणदी, नागराळे, बुर्ली, संतगाव, शिरगाव, बहे, नागठाणे येथे ती मोठी वळणे घेते. नंतर धनगाव, अंकलखोप, औदुंबर येथे पश्चिमेकडे वाहते. भिलवडीला वळसा घालत चोपडेवाडी, सुखवाडी, ब्रह्मनाळपर्यंत ती पुन्हा पूर्वेकडे वाहते. प्रत्येक वळणावर तिच्या प्रवाहाचा वेग वाढतो. त्यामुळे या वळणावर असलेल्या गावांना पुराच्या कालावधीमध्ये वाढलेल्या प्रवाहाचा तडाखा बसतो. याच बाबी लक्षात घेऊन डॉ. पतंगराव कदम यांच्या पुढाकाराने २००५ च्या महापुरानंतर गावोगावी पूरसंरक्षक भिंती उभारण्यात आल्या. या भिंती असलेल्या ठिकाणी नदीकाठाची फारशी हानी झाली नाही. परंतु जेथे भिंती नाहीत, तेथे नदीकाठच्या जमिनीचे मोठे नुकसान झाले आहे.
पलूस तालुक्यात ज्या ठिकाणी पूरसंरक्षक भिंती व बंधारे बांधण्यात आले आहेत, त्या भागात बहुतांश धार्मिक स्थळे किंवा स्मशानघाट आहेत. भिंतींमुळे या भागात पुराचे पाणी सरळ आले नसल्याचे दिसून येते. परंतु जेथे भिंत नाही, तिकडून पाण्याचा वेगवान प्रवाह गावामध्ये शिरल्याचे दिसते. नव्याने पूररेषा निश्चित करून पूरसंरक्षक भिंतींची संख्या वाढविल्यास पुराची तीव्रता कमी होण्यास मदत होणार आहे.