सांगली : पलूस येथील मंडल अधिकारी किरण नामदेव भिंगारदेवे (वय ५७, रा. विटा) व खासगी व्यक्ती वसंत रामचंद्र गावडे ऊर्फ बारू (७१) या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी रंगेहाथ पकडले होते. दोघांना मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात आले. मंडल अधिकारी भिंगारदेवे यास एक दिवसाची कोठडी, तर खासगी व्यक्तीची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांनी त्यांच्या पत्नीच्या नावे जमीन खरेदी केली आहे. या जमिनीचा सात-बारा उताऱ्याच्या नोंदीत तक्रार करण्यात आली होती. हा तक्रारी अर्ज मंडल अधिकारी भिंगारदेवे याच्याकडे करण्यात आला होता. तो अर्ज निकाली काढण्यासाठी भिंगारदेवे याने खासगी व्यक्ती वसंत गावडे याच्यामार्फत दहा हजारांच्या लाचेची मागणी केली.
दरम्यान, तक्रारदार यांनी सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. विभागाकडून तक्रारीची पडताळणी करण्यात आली. मंडल अधिकारी भिंगारदेवे याच्यासाठी दहा हजारांची मागणी केली असून, चर्चेअंती आठ हजारांच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार सोमवारी पलूस येथील दत्तनगर भागात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून मंडल अधिकारी याच्यासाठी आठ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. मंडल अधिकाऱ्यासाठीच ही लाच घेतल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले. त्यानुसार दोघांविरोधात पलूस पोलीस ठाण्यात लाचलुचपत अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. मंडल अधिकाऱ्यास पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याचे लाचलुचपतचे उपअधीक्षक सुजय घाटगे यांनी सांगितले.