सांगली : माणुसकीच्या गाठी, निसर्गप्रेमाची कृतीशील सप्तपदी, हजारो हृदयांमधून बरसणाऱ्या आशिर्वादरुपी अक्षतांत न्हाऊन निघत इस्लामपुरचे रणजित आणि तेजश्री या दोघांनी महात्मा ज्योतिबा फुलेंच्या सत्यशोधक विवाहाचा आनंद लुटला. माणुसकीचे विचार जपतानाच पर्यावरण रक्षणाची मुहूर्तमेढ रोवून वाचलेला तांदुळ अंधशाळेला भेट दिल्याने या सोहळ््यात हजारो वऱ्हाडींनाही प्रभावीत केले.दरवर्षी महाराष्ट्रात ४ लाख विवाहसोहळ््यांमधून कित्येक टन तांदळाची नासाडी केली जाते. दुसरीकडे अन्नासाठी कित्येक कुटुंबांना जिवाचे रान करून जगण्याची कसरत करावी लागते. हा विरोधाभास समाजासाठी घातक असल्याने सामाजिक जाणिवा जपत, विचारांचा जागर आणि कृतीशील पावलांनी वाटचाल करीत इस्लामपूरमध्ये पार पडलेल्या सत्यशोधक विवाह सोहळ््याने हजारो लोकांची मने जिंकली.
राजारामबापू दध संघाच्या संचालिका विजयमाला पाटील आणि साखराळे येथील माजी उपसरपंच दादासाहेब पाटील या दाम्पत्यांनी त्यांचा मुलगा रणजितचा विवाह निश्चित केला. रणजित हा पुरोगामी विचाराने वाटचाल करणारा असल्याने त्याला समाजाला उपयोगी ठरेल अशापद्धतीचा विवाह करायचा होता.
सांगलीतील सत्यशोधक कार्यकर्ते विजयबापू गायकवाड व ए. डी. पाटील यांनी रणजितच्या इच्छेला पाठबळ देत त्यांच्या आई-वडिलांसह भावकीशी चर्चा केली. महात्मा ज्योतिबा फुलेंच्या सत्यशोधक विवाहामागची महती त्यांनी सांगितली. त्यांचे प्रबोधन यशस्वी झाले आणि विवाह सत्यशोधक पद्धतीने तसेच निसर्गपूरक करण्याचे निश्चित झाले.इस्लामपूर येथील एका कार्यालयात ११ जुलै रोजी या अनोख्या सोहळ््यासाठी नातलग, मित्रपरिवारासह अनेक राजकीय नेते, कार्यकर्ते उपस्थित राहिले. राष्ट्र्वादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही या सोहळ््याला हजेरी लावली होती. वध-वरांचे आगमन स्टेजवर झाल्यानंतर त्यांनी प्रथम पृथ्वीच्या प्रतिमेस नमस्कार करून एका कुंडीत वृक्षारोपण करून त्याला पाणी घातले. त्यानंतर पालक सन्मान कार्यक्रम पार पडला.
दोघांंनी सेवाभाव जपत एकमेकांचा आदर करीत संसार करण्याची शपथ घेतली. महात्मा ज्योतिबा फुले यांच्य वेशभूषेतील एका व्यक्तीने त्यांना ही शपथ दिली. त्यानंतर सत्यशोधकी मंगलाष्टका म्हणत त्यांच्यावर फुलांच्या अक्षता टाकण्यात आल्या.विवाह मंडपात दर्शनी बाजुस संत, महापुरुषांनी सांगितलेली वचने, विचार, अभंग, काव्यपंक्ती यांसह प्रतिमा लावण्यात आल्या होत्या. उजव्या बाजुला छत्रपती शिवरायांचा तसेच राष्टमाता जिजाऊ यांचा पुतळा ठेवण्यात आला होता. विवाहसोहळा पार पडल्यानंतर त्यांनी महापुरुषांच्या प्रतिमांना अभिवादन केले.
किमान नासाडी तरी रोखावीज्यांना सत्यशोधक विवाहपद्धती स्वीकारायची नाही व अन्य पारंपारिक पद्धतीने विवाह करायचा आहे अशा लोकांनी किमान तांदळाची नासाडी तरी टाळावी. फुलांच्या अक्षता टाकण्यामुळे काहीही फरक पडत नाही, मात्र वाचलेला तांदुळ गरिबांना व गरजुंना दिल्याने त्यांच्या आयुष्यात खुप चांगला फरक पडत असतो. त्यामुळे या गोष्टीचा अंतर्भाव प्रत्येकाने लग्नात करावा.- ए. डी. पाटील,सत्यशोधक कार्यकर्ते, सांगली