तासगाव : सर्वसामान्य लोकांची कामे गावातच व्हावीत, शेतकरी-गोरगरिबांसाठी असणाऱ्या शासनाच्या योजना लोकांना कळाव्यात, या उद्देशाने तासगाव पंचायत समितीने ‘पंचायत समिती आपल्या गावी’ हा उपक्रम सुरू केला आहे. आतापर्यंत चार दिवसात सुमारे २० गावांना भेटीचे कार्यक्रम झाले आहेत. पंचायत समितीच्या सभापती हर्षला पाटील, उपसभापती विश्वास पाटील यांच्यासह पंचायत समितीच्या विविध विभागांचे प्रमुख, तसेच राज्य सरकारच्या विविध खात्यांचे प्रतिनिधी एकत्रित येऊन संबंधित गावात जाऊन लोकांचे प्रश्न ऐकून घेतात. ज्या गावात जायचे आहे, त्या गावात आधीच लोकांना, ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी यांना कळविण्यात येते. गावातील एखाद्या प्रशस्त सभागृहात सर्व अधिकारी व ग्रामस्थांची बैठक होते. यातून गावपातळीवरच्या तसेच वैयक्तिक स्वरुपाच्या शासनाच्या लाल फितीत अडकलेल्या कामांची चर्चा होऊन किरकोळ प्रश्न जागीच निकालात काढण्यात येतात. गावपातळीवरील रस्त्यांचे, गटारींचे प्रश्न यासाठी निधीची आवश्यकता, या विषयावरही चर्चा होत असल्याचे चित्र आहे.मागील आठवड्यापासून पंचायत समितीने हा उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती मतदारसंघनिहाय हा दौरा ठरविण्यात आला आहे. त्या भागातील जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य यांना बरोबर घेऊन हा दौरा सध्या सुरू आहे. चार दिवसात सावळज जिल्हा परिषद संपूर्ण मतदारसंघ मणेराजुरी, मांजर्डे मतदारसंघाचा काही भाग अशा २० गावात हा उपक्रम राबविण्यात आला आहे. तालुक्याच्या ठिकाणी येता येत नसलेल्यांना त्यांचे प्रश्न मांडण्याचीही संधी मिळत असल्याने ग्रामस्थ आपले प्रश्न मांडत आहेत.पंचायत समिती, जिल्हा परिषद, तसेच शासनाच्या विविध योजनांची लोकांना माहिती व्हावी यासाठी एक फलक तयार करुन तो गावातच लावण्यात येत आहे. याशिवाय विविध कामांसाठी लोकांनी नेमके कुणाला भेटायचे आहे, कुणाकडे अर्ज करायचा आहे, तो अर्ज शासनाने किती दिवसात निकाली काढायचा आहे, याची माहिती देणारा फलकही गावात लावण्यात येत आहे.स्थानिक पातळीवरचे राजकारण बाजूला करीत शासन म्हणून पंचायत समितीकडून हा उपक्रम राबविला जात असल्याची प्रतिक्रिया तासगाव पंचायत समितीचे सभापती हर्षला पाटील, उपसभापती विश्वास पाटील यांनी दिली. (वार्ताहर)अन्न सुरक्षेसाठी खास प्रयत्न अन्न सुरक्षा योजनेत अनेकांच्या नावांचा समावेश झाला नाही. गावातील ग्रामस्थांच्या भेटी घेऊन गरजूंना या योजनेचा लाभ देण्याच्यादृष्टीने प्रयत्न करणार असल्याचेही पदाधिकाऱ्यांनी सांगितले.जिल्हा परिषद, पंचायत समिती मतदारसंघनिहाय हा दौरा ठरविण्यात आला आहे. त्या भागातील जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य यांना बरोबर घेऊन हा दौरा सध्या सुरू आहे.विविध कामांसाठी लोकांनी नेमके कुणाला भेटायचे आहे, कुणाकडे अर्ज करायचा आहे, तो अर्ज शासनाने किती दिवसात निकाली काढायचा आहे, याची माहिती देणारा फलकही गावात लावणार असल्याचेही हर्षला पाटील यांनी सांगितले.
पंचायत समिती ‘आपल्या’ गावी
By admin | Published: January 15, 2015 10:51 PM