शिराळा : पाचुंब्री ( ता. शिराळा ) येथील बांबवडे फाट्यानजीक काळी वाट परिसरात प्रकाश शंकर माने यांच्या ऊसाच्या फडात बिबट्याची दोन बछडी आढळली होती. वन विभागाच्या प्रयत्नांनंतर आईने त्यांना काल, बुधवारी उचलून सुरक्षित ठिकाणी नेले.पिलांना आईने न्यावे यासाठी वन विभागाचे प्रयत्न सुरु होते. पिलांना आहे, त्याच ठिकाणी ठेऊन त्यावर लक्ष ठेवले होते. मंगळवारी तिने पिलांना नेले, पण काही वेळानंतर पुन्हा तेथेच आणून ठेवले. मात्र बुधवारी पिलांना घेऊन मादी निघून गेली. सोमवारी (दि. ४) माने यांच्या शेतात ऊसतोडणीवेळी ही पिले दिसली होती. उप वनसंरक्षक नीता कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली वन क्षेत्रपाल एकनाथ पारधी, वन रक्षक रजनीकांत दरेकर, वनपाल अनिल वाजे, वनरक्षक स्वाती कोकरे, हनुमंत पाटील, संतोष कदम, दादा शेटके, अक्षय ढोपळे आदी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी चार ते पाच दिवसांची मादी बछडी दिसून आली. वन विभागाच्या पथकाने त्यांना सुरक्षित ठिकाणी नेऊन ठेवले. रात्रीच्या देखरेखीसाठी चार नाईट व्हिजन कॅमेरे लावले.सोमवारी व मंगळवारी सायंकाळी साडेसातच्या दरम्यान मादी बछड्यांजवळ आल्याचे कॅमेऱ्यांत दिसले. ती २० मिनिटे तेथे थांबली होती. त्यानंतर दोन्ही बछड्यांना उचलून याच ऊसशेतीत काही अंतरावर नेऊन ठेवले. हा प्रयत्न दोनवेळा झाला.माने यांनी वन खात्याच्या सूचनेनुसार चार गुंठे ऊस न तोडता तसाच ठेवला. तेथे बछड्यांना ठेवले. बुधवारी रात्री साडेआठच्या दरम्यान पिलांची आई त्यांच्याजवळ आली. सुमारे दोन तास बछड्यांजवळ थांबली. रात्री साडेदहाच्या दरम्यान बछड्यांना घेऊन सुरक्षित ठिकाणी निघून गेली. वन विभागाच्या तीन दिवसांच्या खटपटीला यश आले.
Sangli: पांचुब्रीतील बिबट्याची बछडी अखेर आईच्या कुशीत, तीन दिवसांची धडपड यशस्वी
By संतोष भिसे | Published: March 07, 2024 6:56 PM