सांगली : पंढरपूर येथील अपक्ष नगरसेवक संदीप पवार यांच्या खुनाचे सांगली ‘कनेक्शन’ असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. सोलापूर एलसीबीचे पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांच्या पथकाने सोमवारी सांगलीत कर्नाळ रस्त्यावर छापा टाकून संशयित बबलू सुरवशे याच्याबद्दल चौकशी केली. पण तो पथकाच्या हाती लागला नाही. रात्री उशिरा पथक सोलापूरला रवाना झाले.
संदीप पवार यांचा रविवारी भरदिवसा पंढरपुरात गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. दहा ते बारा जणांनी हा हल्ला केल्याचे निष्पन्न झाले आहे. भरदिवसा झालेल्या या खुनाचा छडा लावण्यासाठी पंढरपूर पोलिसांसह एलसीबीचे पथकही स्वतंत्रपणे तपास करीत आहे. तपासात बबलू सुरवशे हा संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. बबलू रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्या वर्तणुकीत सुधारणा व्हावी, यासाठी त्याला घरच्यांनी सांगलीत कर्नाळ रस्त्यावरील नातेवाईकांकडे ठेवले आहे.
बबलूवरही गतवर्षी कर्नाळ रस्त्यावर भरदिवसा गोळीबार झाला होता. त्याने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. यामध्ये त्याने नगरसेवक संदीप पवार यांच्यावर संशय घेतला होता. शहर पोलिसांनी याचा तपास केला. घटनास्थळी गोळ्यांच्या पुंगळ्या कुठेही सापडल्या नाहीत. तसेच संदीप पवार हे घटनेवेळी पंढरपुरात असल्याचे पुरावे मिळाले होते. सुरवशे याने बनाव करुन खोटी फिर्याद दिल्याचे स्पष्ट झाल्याने त्याची तक्रार निकालात काढण्यात आली होती.
पवार यांचा खून झाल्याने आता बबलूवर संशय बळावला आहे. याचा तपास करण्यासाठी पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांचे पथक सोमवारी सांगलीत दाखल झाले होते. कुंभार यांची यापूर्वी सांगलीत सेवा झाली असल्याने त्यांना या भागातील माहिती आहे. त्यांनी कर्नाळ रस्त्यावर बबलू राहत असलेल्या त्याच्या नातेवाईकांकडे चौकशी केली. मात्र चौकशीवेळी बबलू सापडला नाही. यासंदर्भात निरीक्षक कुंभार यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, सांगलीत तपासाची दिशा मिळाल्याने चौकशीसाठी आलो आहोत. बबलूकडे चौकशी करायची आहे. अजून कोणालाही ताब्यात घेतलेले नाही.पथक तळ ठोकूननिरीक्षक कुंभार यांचे पथक रात्री उशिरापर्यंत सांगलीत तळू ठोकून होते. बबलूची कुठे उठ-बस असते, तो काय काम करतो, पवार यांच्या खुनावेळी तो कुठे होता, याची माहिती काढण्यात आली. यातून काही महत्त्वाचे धागेदोरे मिळाल्यानंतर पथक सांगलीतून निघून गेले.