सांगली : काँग्रेसच्या फोडाफोडीच्या राजकारणाला शह देत सत्ताधारी भाजपने महापालिकेच्या स्थायी समितीवरील वर्चस्व बुधवारी कायम राखले. स्थायी सभापती निवडीत भाजपच्या पांडूरंग कोरे यांनी काँग्रेसचे मंगेश चव्हाण यांचा २ मतांनी पराभव केला. कोरे यांना ९ तर चव्हाण यांना ७ मते मिळाली.स्थायी सभापतीपदावरून सत्ताधारी भाजपमध्ये नाराजीनाट्य रंगले होते. या पदासाठी भाजपचे गजानन मगदूम व पांडूरंग कोरे यांच्यात चुरस होती. कोरे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाल्यानंतर मगदूम व अनारकली कुरणे हे दोन सदस्य नाराज झाले होते. भाजपमधील नाराजीचा फायदा उचलण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीनेही मोर्चेबांधणी केली होती.
आघाडीच्या सर्व सदस्यांना सहलीवर पाठवून भाजपच्या नाराज सदस्यांशी संपर्क ठेवला होता. दोन दिवस आघाडीचे प्रमुख नेते नाराजांच्या संपर्कात होते. एका मंत्र्यानेही फिल्डिंग लावली होती. तर काँग्रेस उमेदवाराचे नातेवाईकही मैदानात उतरले होते. नाराजांना ऑफरही देण्यात आली होती. दुसरीकडे भाजप नेत्यांनीही नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्न केले.बुधवारी सकाळी भाजपच्या सर्व नऊ सदस्यांना विश्रामबागमधील एका मंगल कायार्लयात एकत्रित आणण्यात आले. तिथे भाजपचे नेते शेखर इनामदार, सुरेश आवटी यांनी पुन्हा एकदा नाराजांची समजूत काढली. नाराज सदस्यांनी भाजपच्या पाठिशी राहण्याचा निर्णय घेतल्याने आघाडीचे फोडाफोडीचे राजकारण फसले. त्यानंतर ऑनलाईन सभेत सभापती पदाची निवड झाली. यावेळी भाजपचे पांडूरंग कोरे यांना ९ तर मंगेश चव्हाण यांना ७ मते मिळाल्याने स्थायी समितीवरील वर्चस्व भाजपने कायम राहिले.