सांगली : अन्न व औषध प्रशासन विभागाच्या भरारी पथकाने गुरुवारी सांगली शहरामध्ये कारवाई करून ४५ लाख २५ हजार ९६० रुपये किमतीचा पानमसाला व सुगंधित तंबाखूचा साठा जप्त केला. तसेच यामध्ये दोन वाहने जप्त केली असून, जुना बुधगाव रस्त्यावरील गोदामही सील करण्यात आले आहे.अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त (अन्न) नीलेश मसारे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने अन्नसुरक्षा अधिकारी चन्नावीर स्वामी व अनिल पवार यांनी जुने बुधगाव रोड येथील अल्ताफ रमजान मुलाणी यांच्या गोदामाची तपासणी केली. यावेळी महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेले पानमसाला व सुगंधित तंबाखूचा साठा आढळून आला. तसेच शेडच्या समोर उभ्या असलेल्या दोन वाहनांची तपासणी केली. यावेळी त्यामध्येदेखील पानमसाला व सुगंधित तंबाखूचा साठा आढळून आला. अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने या ठिकाणी कारवाई करून ४५ लाख २५ हजार ९६० रुपये किमतीचा प्रतिबंधित अन्नपदार्थाचा साठा जप्त केला. तसेच दोन वाहने (किंमत पाच लाख ५० हजार रुपये) जप्त करून ताब्यात घेऊन गोदाम सीलबंद करण्यात आले. या प्रकरणी पुढील तपासाकरिता शहर पोलिस स्टेशन, सांगली येथे प्रथम खबर अहवाल दाखल केले आहेत.जिल्ह्यात विशेष मोहीम राबविणार : नीलेश मसारेजिल्ह्यातील सर्व व्यावसायिकांनी प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा, विक्री करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा, विक्री करताना आढळल्यास अन्नसुरक्षा कायद्यांतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त (अन्न) नीलेश मसारे यांनी दिला.
सांगलीत ४५ लाखांवर पानमसाला, सुगंधित तंबाखू जप्त; दोन वाहने जप्त, गोदाम सील
By अशोक डोंबाळे | Published: June 27, 2024 5:31 PM