लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : ‘औद्योगिक वसाहतींच्या बाबतीत आलेल्या भकासपणामुळे साताऱ्यातील तरुण वर्ग पुणे-मुंबईकडे स्थलांतरित होत आहे. या पार्श्वभूमीवर साताऱ्यातील तरुणाई कास, तापोळा परिसरात पर्यटकांसाठी नवनवीन सोयी उपलब्ध करून रोजगाराचा नवा मार्ग शोधत आहे. ‘सातारा ब्रँड’ अधिकाधिक मजबूत करू पाहणाऱ्या या नवउद्योजकांना साथ देणे तर राहिलेच बाजूला... उलट कास पठार परिसरातील स्थानिक उद्योग बुलडोझरने उद्ध्वस्त करण्याची भाषा होऊ लागल्याने, ‘पंत, बापू... आता सातारा ब्रँडला तुम्हीच वाचवा,’ या भाषेत अनेक संस्थांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् पालकमंत्री विजय शिवतारे यांना विनंती वजा आवाहन केले आहे. याबाबत कास पठार विकास प्रतिष्ठानने काढलेल्या पत्रकात म्हटले आहे की, कास पठार परिसरातील अतिक्रमणे बुलडोझर लावून उद्ध्वस्त करू, असे चार दिवसांपूर्वी पालकमंत्री विजय शिवतारे म्हणाले होते. मुळात या भागातील स्थानिकांच्या अडचणी समजून घेऊन हे वक्तव्य झाले असते तर सातारकरांना आनंद झाला असता. एकीकडे सातारा शहरातील अनेक नामवंत उद्योगधंदे बंद पडत चालले आहेत. अनेक स्थलांतरित होत आहेत. या पार्श्वभूमीवर रोजगाराच्या वाटा शोधत स्थानिक तरुण कास पठाराकडे वळला आहे. दरवर्षी लाखो पर्यटक कासकडे येत असताना पठार परिसरात त्यांना साधी पाण्याची बाटलीही मिळत नव्हती. परंतु काळाची गरज ओळखून अनेकांनी आपापल्या जागेत पर्यावरणाला धक्का लावू न देता न्याहरी अन् निवास या सरकारी योजनेला पूरक अशी निवासस्थाने बांधली आहेत. ‘सातारा ब्रँड’ अधिकाधिक मजबूत करण्यासाठी धडपडणाऱ्या या स्थानिक लोकांना सहकार्य करणे तर दूरच राहिले. उलट कुणाच्या तरी सांगण्यावरून उद्ध्वस्त करण्याची भाषा होत असेल तर साताऱ्याचे खरे पालक कोण?, असा निराशजनक प्रश्न सातारकरांसमोर उभा ठाकला आहे. तेव्हा मुख्यमंत्री अन् पालकमंत्री यांच्याबद्दल सातारा जिल्ह्याला असलेल्या आपुलकीच्या भावनेचा विचार करून उलट कास पठार परिसराला अधिकाधिक चांगले पर्यटनस्थळ कसे बनवता येईल, याचा दोघांनी विचार करावा, असे आवाहन कास पठार विकास प्रतिष्ठानच्या वतीने सोमनाथ जाधव, लक्ष्मण गोगावले, शंकरराव जांभळे आणि विनोद गोगावले यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी केले आहे. पाठीवर थाप नको; पण पोटावर पाय देऊ नका! महाबळेश्वर तालुक्यातील भिलार गावी पुस्तकांचं गाव निर्माण करून सातारा ब्रँडला हातभार लावणाऱ्या फडणवीस सरकारने कास पठारच्या विकासाकडे लक्ष द्यावे. कास परिसरात दरवर्षी लाखो पर्यटक येत असतात. या ठिकाणी चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न करणाऱ्या स्थानिकांच्या पाठीवर एकवेळ शाबासकीची थाप मारता आली नाही तर हरकत नाही. पण, बुलडोझरने बांधकामे उद्ध्वस्त करण्याची भाषा करून पोटावर पाय देऊ नका, अशी विनंतीही करण्यात आली आहे.
पंत, बापू... सातारा ब्रँड जगवा!
By admin | Published: May 19, 2017 12:15 AM