इस्लामपूर : शहरातील चोरट्यांच्या वाढत्या उच्छादाला रोखण्यासाठी रात्रगस्तीला रस्त्यावर उतरलेल्या जमावाने जावडेकर चौक परिसरातील घराचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न करणाऱ्या महिलेसह दोघा चोरट्यांना पकडून बेदम मारहाण केली. या मारहाणीत चोरटे रक्तबंबाळ झाले. हे तिघेही झारखंड या राज्यातील असल्याचे स्पष्ट झाले. अंजुमन हतीम (वय २०) आणि महंमद असगर अन्सारी (४०, दोघे रा. झारखंड) अशी या चोरट्यांची नावे आहेत. लाल रंगाची साडी आणि पांढरा मळकट झब्बा आणि पायजमा घालून या दोघांनी गुरुवारी सकाळी कापूसखेड नाक्यावरील एका घरात सर्वेक्षण करण्याच्या बहाण्याने घुसून घरातील महिलेच्या तोंडावर उशी दाबून तिच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र आणि कानातील रिंगा पळवल्या. त्यानंतर शेजारील माळी गल्लीतील चंद्रकांत पेठकर यांच्याही घरी चोरीचा प्रयत्न केला होता. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेनंतर चोरट्यांचा उच्छाद आणि पोलिसांची निष्क्रियता पाहून नागरिक संतापले होते. या परिसरातील सुमारे पाचशेवर नागरिक, युवकांनी गरुवारी रात्रगस्तीला सुरुवात केली. जावडेकर चौकातील युवकांनी रस्त्यावर न उतरता घराच्या उंच जागेवरून अंधरात लपून पहारा देण्याला प्राधान्य दिले. रात्री अडीचच्या सुमारास लाल साडी परिधान केलेली महिला आणि तिच्यासोबत दोन पुरुष असे तिघे एका बोळातून बाहेर पडले. तेथे तिघांनी परिसराचा अंदाज घेत जाधव यांच्या बंद असलेल्या घराकडे मोर्चा वळवला. गेटमधून आत जाऊन त्यांनी कुलूप तोडण्याचा प्रयत्न चालवला होता. नेमकी ही संधी साधत गस्तीवरील युवकांच्या जमावाने त्यांना घेरले. घराला संरक्षकभिंत असल्याने चोरट्यांना पळण्याची संधी मिळाली नाही. चोरटे सापडल्याचे कळताच कापूसखेड नाका परिसरातील जमावही आला. त्यानंतर या जमावाने चोरट्यांना रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण केली. या मारहाणीवेळी त्यांनी एक शब्दही उच्चारला नाही. शेवटी तिघांना पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. पोलिसांनी सकाळी त्यांच्याकडे चौकशी केल्यावर त्यांनी कापूसखेड नाका येथील सौ. कमल किसन पाटील यांच्या गळ्यातील दागिने लुबाडल्याची कबुली दली. पाटील यांनी पोलीस ठाण्यात येऊन या महिलेसह एका साथीदाराला ओळखले. त्यानंतर पोलिसांनी रितसर या दोघांना ताब्यात घेतले. चोरट्यांचा मुक्काम तेथेच गेल्या महिनाभरापासून हे चोरटे कापूसखेड नाका परिसरातच वास्तव्यास आहेत. भाड्याने खोली घेऊन ते राहतात. रात्री अडीचच्या सुमारास जमावाने त्यांना पकडल्यानंतर घरमालकही त्यांची तरफदारी करीत होता. मात्र, संतापलेल्या जमावाने चोरट्यांची यथेच्छ धुलाई केली. त्यांच्या खोलीची झडती घेतल्यावर तेथे कोणतेही प्रांपचिक साहित्य अथवा अंथरुण-पांघरुण नव्हते. कागद अंथरुण त्यावर ते झोपत, अशी धक्कादायक माहिती समोर आली. त्यांची ही खोलीसुद्धा ऊसशेतीलगत आहे, हे विशेष.
परप्रांतीय चोरट्यांना जमावाचा चोप
By admin | Published: July 18, 2015 12:05 AM