बिळाशी : ग्रामीण भागात पारावरच्या गप्पांमध्ये बांधावरच्या वादाच्या चर्चा घडायच्या. यात्रा-जत्रांमध्ये जमिनीच्या वादातून मुडदे पडायचे, पण जेव्हापासून माणसांनी हातातल्या काठ्या-कुऱ्हाडी आणि मेंदूतला राग बाजूला ठेवून पोरांच्या हातात लेखण्या दिल्या, तिथून पारावरच्या गप्पांचा नूरच पालटला... पारावरच्या गप्पामध्ये आता मांगरूळचे फत्तेसिंग पाटील आयपीएस झाले. बिळाशीचे सुनील वारे आयआरएस झाले. राहुल पाटील आयएफएस झाले. अभिनय कुंभार आयएएस, सरुडचे सुगंध चौगुले आयएफएस झाले. कोकरुडचे विश्वास नांगरे-पाटील आयपीएस व आनंद पाटील आयएएस झाल्याच्या चर्चा झडू लागल्या.... सामान्य शेतकरी, कष्टकरी कुटुंबातील ही मुले प्रशासनात उच्चपदावर गेल्यामुळे ग्रामीण भागाला नवा आयाम मिळाला.
सुनील वारे : वित्त सल्लागार पश्चिम रेल्वे मुंबई
अतिशय प्रतिकूल परिस्थिती. वडील घायपातापासून अखंड दोर तयार करायचा पारंपरिक व्यवसाय जपत भजन-कीर्तनात रमायचे. धार्मिक वृत्तीच्या वडिलांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा ‘शिका संघटित व्हा व संघर्ष करा’, हा संदेश मुलांच्या काळजात बिंबवला. ते स्वतः चौथी पास, पण स्वतःची सगळी मुलं उच्चशिक्षित केली. त्यांच्यामध्ये स्वप्न पेरली. प्राथमिक माध्यमिक शिक्षण वारणा प्रसाद विद्यालय, बिळाशी येथे पूर्ण केल्यानंतर अकरावी-बारावी वारणानगरला आणि अभियांत्रिकी पदवी सांगलीच्या वालचंदमधून घेतली. १९९१ ला स्टील ॲथोरिटी येथे नोकरी मिळाली. तिथे सर्वजण यूपीएससीची तयारी करायचे. ते बघून त्यांनीही १९९३ मध्ये यूपीएससीची तयारी सुरू केली. पहिल्या प्रयत्नात पूर्व परीक्षा पास झाले. सातव्या प्रयत्नात १९९९ साली ते ३२८ व्या रँकने आयआरएस झाले. परिस्थितीच्या जिवांची फुली करण्याचे सामर्थ्य असणाऱ्या या मराठी अधिकाऱ्यांनी गुवाहाटी (बंगाल) येथून सेवेची सुरुवात केली. सध्या ते वित्त सल्लागार पश्चिम रेल्वे मुंबई येथे कार्यरत आहेत. अल्पशिक्षित आई-वडिलांच्या पोटी जन्माला येऊनही स्वतःच्या सामर्थ्याने मोठेपण मिळवता येते, हे सुनील वारे यांनी दाखवून दिले आहे.
फत्तेसिंग पाटील, विशेष पोलीस महानिरीक्षक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग पुणे.
स्पर्धा परीक्षा हे दिव्य फक्त उच्चभ्रू आणि शहरी बड्या श्रीमंत बाप्पांच्या पोरांची मक्तेदारी असल्याचा भास ग्रामीण भागात ठासून भरलेला असताना १९८० ते २००० या दरम्यान तो मोडीत काढण्याचे काम ग्रामीण भागातील बुद्धिवान तरुणांनी केले.
मांगरुळ तालुका शिराळा येथील फत्तेसिंग कृष्णराव पाटील यांनी १९८१ साली महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन पहिल्याच प्रयत्नात जिल्हा अधीक्षक भूमिअभिलेख ही पोस्ट मिळवली आणि दुसऱ्या प्रयत्नात पोलीस उपाधीक्षक पदी निवड झाली. ग्रामीण भागातील खेड्यापाड्यात राहून घरचं खाऊन शेतकऱ्यांची पोरं प्रशासनात जाऊ शकतात हा विश्वास देण्याचं काम फत्तेसिंग पाटील यांनी सुरुवातीला केले.
वडिलांना चार भाऊ, शेतकरी कुटुंबाची पार्श्वभूमी, वडील प्राथमिक शिक्षक, घरात गुराळ मांडव, फड, नदीवर इंजिन बैलजोडी माणसांचा राबता... मांगरूळमध्ये बालपण.. माध्यमिक शिक्षणासाठी चिंचेश्वराचा डोंगर चढून बिळाशीला वारणा प्रसादमध्ये जायचं, सुट्टीच्या दिवशी डोंगरभर गुरामाग फिरायचं, शेतात जाऊन घरच्या माणसाची जेवणं पोहोच करायची आणि मग शाळा गाठायची... शाळेतील एनसीसीचे शिक्षक कोळेकर सरांनी सैन्यातील अधिकारी व्हायची जिगर पेरली. तिथून त्यांना वर्दीची ओढ लागली. बीएला पॉलिटिकल सायन्सला राजाराम कॉलेजमधून विद्यापीठात सुवर्णपदक पटकावले.शहाजी लॉ कॉलेजला कायद्याची पदवी घेतली आणि १९८१ ला प्रशासनात दाखल झाले. युनोच्या शांतीसेनेत युगोस्लाव्हियाची राजधानी कोसोवो येथे एक वर्ष कार्यरत होते.. त्यानंतर पोलीस अधीक्षक नांदेड, रत्नागिरी, डीसीपी कल्याण डीसीपी सोलापूर. विशेष पोलीस महानिरीक्षक मोटार परिवहन विभाग महाराष्ट्र राज्य पुणे, विशेष पोलीस महानिरीक्षक राज्य गुन्हे अन्वेषण विभाग पुणे येथे सध्या ते कार्यरत आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाणीव असणारे लोक प्रशासनात असतील तर प्रशासन अधिक प्रभावीपणे ते प्रश्न सोडवू शकतात. नांदेड येथे मराठा मोर्चा हाताळण्याची उत्कृष्ट कामगिरी फत्तेसिंग पाटील यांनी केली. माध्यमिक वयात संबोध स्पष्ट झाले, तर स्पर्धा परीक्षेत लवकर यश प्राप्त होते. त्यासाठी कष्ट करण्याची तयारी हवी एवढे मात्र नक्की....
राहुल नामदेव पाटील
आय. एफ. एस.
राहुल पाटील तरुणाईमध्ये जिगर पेरण्याचा काम करणारा एक अवलिया अधिकारी... पुढे गेल्यानंतर मागं वळून सर्वसामान्य कुटुंबातील घरामध्ये उजेड पेरण्याचे काम करणारा तरुण अधिकारी इतरांना बळ देत आहे. गावातील डझनवर पोरांसाठी स्पर्धा परीक्षेचे अभ्यास केंद्र उभे करून त्यांना वारंवार मार्गदर्शन करण्याची भूमिका राहुल पाटील बजावत आहेत.
आई गृहिणी, वडील वैद्यकीय अधिकारी, बिळाशी येथे जन्म आणि बालपणही!!! बिळाशीच्या वारणा प्रसादमध्ये माध्यमिक शिक्षण घेत असताना आजूबाजूला स्पर्धा परीक्षेतून प्रशासनात जाणाऱ्यांची संख्या वाढत होती.
अकरावी, बारावी विवेकानंद कॉलेज कोल्हापूरला झाल्यानंतर पुण्यातून मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेऊन त्यांंनी खासगी नोकरी पत्करली. तिथे मन रमेना. लहानपणी कुस्त चा नाद केला, पण पैलवान होता आलं नाही. त्यातून खिलाडूवृत्ती जपत स्पर्धा परीक्षेकडे वळले. २०१४ साली दुसऱ्या प्रयत्नात त्यांची आयएफएस निवड झाली. वडिलांची इच्छा प्रशासनात जावे अशी होती. त्यामुळे सुरुवातीपासूनच अभ्यास सुरू होता. चंद्रपूर येथे बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे संचालक असताना बांबूच्या माध्यमातून शेकडो स्त्री-पुरुषांना रोजगार मिळाला. बांबूच्या राख्या देशभरात गेल्या व त्यांचे सर्वत्र कौतुक झाले. सध्या ते पुणे येथील उपवनसंरक्षक म्हणून कार्यरत आहेत. तरुणांनी आपल्यातील स्वतःला ओळखून कार्यक्षमतेचा योग्य वापर केल्यावर यश लांब नसते. स्पर्धा परीक्षा हे सर्वसामान्य मुलांना स्वतःला सिद्ध करण्याचं अतिशय मोलाचे ठिकाण आहे, असेही ते शेवटी म्हणाले..एकदा यशस्वी झालो की, आपल्याबरोबर अनेकांच्या जीवनात बदल करण्याचं सामर्थ्य आपणामध्ये येत असतं.