सांगली : जिल्ह्याच्या तापमानातील चढ-उतार सुरूच असून, मंगळवारच्या तुलनेत बुधवारी किमान तापमानात अंशाने, तर कमाल तापमानात २ अंशाने घट झाली. दिवसभर वातावरण ढगाळ राहिले.
भारतीय हवामान खात्याच्या निरीक्षणानुसार आणखी काही दिवस जिल्ह्याच्या बहुतांश भागात वातावरण अंशत: ढगाळ राहणार आहे. सांगली शहर व परिसरात सकाळपासून ऊन-सावलीचा खेळ रंगला होता. ढगाळ वातावरण असले, तरी कोठेही पावसाची चिन्हे नाहीत. ११ डिसेंबरपासून जिल्ह्याच्या कमाल व किमान तापमानात मोठी घट होण्याचा अंदाज आहे. किमान तापमान १४, तर कमाल तापमान २९ अंशापर्यंत खाली घसरण्याची शक्यता आहे.
त्यामुळे गेली काही दिवस थंडी कमी झाली होती. आता पुन्हा गारठा सक्रिय होणार आहे. त्यामुळे बोचऱ्या थंडीचा सामना नागरिकांना करावा लागणार आहे. तापमानातील लहरीपणामुळे नागरिकांना आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. अचानक होणारे बदल आजारांना निमंत्रण देणारे ठरत आहेत. त्यामुळे शासकीय रुग्णालयासह जिल्ह्यातील खासगी रुग्णालयात सध्या सर्दी, खोकला, तापाचे रुग्ण वाढत आहेत. कोरोनाची साथ अजून सुरूच असून, त्यात या संसर्गजन्य व वातावरणातील बदलांमुळे होणारे आजार आता त्रासदायी ठरू लागले आहेत. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याबाबत अधिक सतर्क राहण्याची गरज आहे.