अविनाश कोळी ।सांगली : चंगळवादाला महत्त्व देत अनेक गोष्टींसाठी कर्ज काढून योग्य गुंतवणुकीकडे दुर्लक्ष करणाऱ्या नागरिकांमध्ये आता आर्थिक सतर्कता वाढल्याचे चित्र आहे. बचतीबरोबरच आरोग्य, जीवन विम्याकडे लोकांचा कल वाढला असून, यातील सहभागाचे प्रमाण तब्बल ५० टक्क्यांनी वाढले आहे.
कोरोनामुळे निर्माण झालेला आरोग्याचा प्रश्न, लॉकडाऊन काळात निर्माण झालेली बेरोजगारी आणि आर्थिक प्रश्नांची दाहकता यामुळे गेल्या तीन महिन्यांमध्ये गुंतवणूक क्षेत्रात मोठे बदल होत आहेत. आरोग्य व जीवन विम्यासाठी तरतूद करण्याकडे कल वाढला आहे. सांगलीमधील काही विमा व गुंतवणूक सल्लागारांनी दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर महिन्यात झालेल्या आरोग्य विम्याबाबतच्या चौकशा व सहभागाच्या प्रमाणापेक्षा एप्रिल व मे महिन्यातील प्रमाण जवळपास ५० ते ६० टक्क्यांनी वाढले आहे. यापूर्वी केवळ चौकशीसाठी येणाºया कॉलचे प्रमाण अधिक होते. आता चौकशीबरोबर विम्यातील सहभागही वाढलेला आहे.
कोरोनामुळे आरोग्य व जीवन विमा या दोन्ही गोष्टींना लोक प्राधान्य देत आहेत. मेडिक्लेम व लाईफ इन्शुरन्सबाबत लोकांना हप्त्याचे पैसे परत मिळणार नसल्याने ते वाया जाण्याची भीती वाटत होती. मात्र आता त्याची आवश्यकता जाणवल्यामुळे त्यासाठीची तजवीज करण्याची मानसिकता वाढल्याचे गुंतवणूक सल्लागारांचे मत आहे.
कर्ज मागणीचे चित्र बदलणारकोरोना येण्यापूर्वी जिल्ह्यात चारचाकी, दुचाकी, टीव्ही, फ्रीज व अन्य गृहोपयोगी वस्तूंसाठी कर्ज मागणीचे प्रमाण मोठे होते. विविध बॅँकांमार्फत यासाठी कर्जपुरवठा केला जातो. लॉकडाऊन काळात निर्माण झालेली आर्थिक टंचाई पाहता आता कर्ज मागणीचा कलही बदलण्याची चिन्हे असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.