मिरज : लोंढा ते मिरज रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाच्या कामांसाठी मेगाब्लॉक घेण्यात आल्याने या मार्गावरून धावणाऱ्या पॅसेंजर व एक्स्प्रेस रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. काही लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्या एक ते दोन तास विलंबाने धावणार असल्याने मिरजेतून बेळगाव व हुबळीकडे जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होणार आहे.दक्षिण-पश्चिम रेल्वेकडून लोंढा ते मिरज रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाचे काम युध्द पातळीवर सुरू आहे. रविवारपासून उगार खुर्द ते विजयनगर स्थानकापर्यंत दुहेरीकरणाच्या कामासाठी हुबळी-मिरज-हुबळी एक्स्प्रेस, मिरज-लोंढा व मिरज-कॅसलरॉक एक्स्प्रेस या रेल्वेगाड्या सहा जूनपर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत. तिरुपती-कोल्हापूर हरिप्रिया एक्स्प्रेस ५ जूनपर्यंत मिरज व कोल्हापूर स्थानकात न येता बेळगांवातूनच तिरुपतीला जाणार आहे. कोल्हापूर-बंगळुरू राणी चेन्नम्मा एक्स्प्रेस २९ मे पासून ६ जूनपर्यंत बंगळुरुहून दोन तास व मिरजेतून ३० मिनिटे उशिराने सुटेल. निजामुद्दीन-यशवंतपूर एक्स्प्रेस मिरजेत ६० मिनिटे थांबेल. पुणे-एर्नाकुलम एक्स्प्रेस ५ जून रोजी ४० मिनिटे व यशवंतपूर-पंढरपूर एक्स्प्रेस मिरज स्थानकावरून २ जून रोजी ६० मिनिटे उशिरा सुटणार आहे. सुटीच्या हंगामातच दक्षिणेत जाणाऱ्या अनेक रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्याने प्रवाशांची गैरसोय होणार आहे.
रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी! 'या' मार्गावरील पॅसेंजर, एक्स्प्रेस रेल्वे रद्द; ऐन सुटीच्या हंगामात गैरसोय होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2023 11:27 AM