पलूस : आपण कोणाचे वारस आहोत याचा विचार इतिहासात होणे आवश्यक आहे. युगा-युगांच्या काळात दक्षिणेत काय घडले याचा विचार करता, दख्खनची वाट कशीही असो, या वाटचालीत मुख्य प्रवाहांना केंद्रवर्ती मानल्यास सामान्य समाजाची अवस्था या काळात काय होती, याचा विचार करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी केले.रामानंदनगर येथील आर्टस्, सायन्स अॅन्ड कॉमर्स कॉलेजमध्ये विद्यापीठ अनुदान आयोग नवी दिल्ली पुरस्कृत इतिहास विषयाच्या राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील कांबळे होते. डॉ. पाटील म्हणाले की, मूठभर समाजाचा विकास होणे म्हणजे सर्वसमावेशक विकास नाही. इतिहासात काही गोष्टी आपण सतरंजीखाली ढकलतो, त्याचे उत्तर देत नाही. मात्र दख्खनच्या पार्श्वभूमीवर आपली भूमिका ठरविताना सर्वच गोष्टींचा विचार होणे गरजेचे आहे. भूतकाळात आपण ज्या ठिकाणी चुकलो, त्यात दुरुस्त्या होणे अत्यावश्यक आहे. समाज एकजिनसी नव्हता, म्हणून आपण स्वराज्य गमावले. संघर्षानंतर जरी ते मिळविले असले तरी, ते टिकविण्यासाठी समाज एकजिनसी ठेवावा लागेल. समारंभाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुनील कांबळे म्हणाले की, दख्खनच्या पठारावर मराठी सत्तेचा उदय झाला. स्वातंत्र्यपूर्व काळात येथे अनेकांनी राज्य केले. मात्र सर्व राज्यात कोल्हापूरचे राजर्षी छत्रपती शाहूंचे संस्थान व बडोद्याचे सयाजीराव गायकवाड यांचे राज्य, ही दोनच राज्ये महत्त्वाची ठरली. लोकहिताचा कारभार करताना त्यांनी अनेक कल्याणकारी योजना राबविल्या.याप्रसंगी चर्चासत्राचे बीजभाषक प्रा. डॉ. डी. एस. गायकवाड (पुणे), प्रा. डॉ. राधिका सेशन (पुणे), प्रा. डॉ. के. एल. एन. मूर्ती (विजापूर), गोपाळराव देशमुख (पंढरपूर), प्राचार्य डॉ. टी. एस. पाटील (कोल्हापूर), प्राचार्य डॉ. आर. एस. मोरे (सावळज) आदींसह विविध महाविद्यालयांतील प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.महाविद्यालयाचे इतिहास विभागप्रमुख प्रा. आर. आर. सोनावळे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. एम. बी. चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले, तर प्रा. एस. एस. मारकवाड यांनी आभार मानले.
भूतकाळातील चुकांच्या दुरुस्तीची गरज
By admin | Published: October 11, 2015 11:22 PM